मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी धिम्या गतीने कारवाई सुरू असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. यासाठी विविध संघटनांनी शनिवारी आझाद मैदानात आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ आदी संघटनांनी सहभाग घेतला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास १० जून रोजी राज्यभर निषेध रॅली आणि १९ जून रोजी जळगाव येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांची नार्को टेस्ट करावी, डॉ. पायलच्या कुटुंबीयांना सरकारकडून एक कोटीची आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केली आहे. तर ही आत्महत्या नसून, हत्या आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे मुंबई अध्यक्ष नवीन पटेल यांनी केली आहे.