मुंबई : मुंबई येथील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमसीए विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे यांनी गुरूवारी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाचा पदभार मावळते संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे हे उपस्थित होते.
डॉ. पूजा रौंदळे या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागाच्या प्राध्यापक व गुणवत्ता हमीच्या अधिष्ठाता व माजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बीएस्सी व एमएस्सी (संगणकशास्त्र) केले आहे. तसेच त्यांनी एसएनडीटी विद्यापीठातून संगणकशास्त्र व तंत्रज्ञान विषयातील आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पीएचडी केली आहे. संगणक क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग व डेटा सायन्स, डिप लर्निंग, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम्स या क्षेत्रात त्यांना विशेष रुची व त्यांचे संशोधन आहे. याप्रसंगी परीक्षा विभागाचे ऑटोमेशन करणे, येथील प्रक्रिया सुव्यवस्थित करणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (एआय) करण्यात येईल असे पदभार स्वीकारताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदाळे यांनी सांगितले.