Join us

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर डॉ. राजेंद्र बडवे आणि डॉ. अनिल डिक्रूझ या दोन मुंबईकरांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:07 AM

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या कार्यभारावर लक्ष ठेवण्याचे काम करतो

मुंबई - केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर (एनएमसी) मुंबईतील दोन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. डॉ. राजेंद्र बडवे आणि डॉ. अनिल डिक्रूझ अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ असून, त्यांनी अनेक दशके सेवा केली आहे. डॉ. बडवे टाटा मेमोरियल सेंटर येथे एमेरिटस प्राध्यापकपदावर कार्यरत आहेत, तर डॉ. डिक्रूझ मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक आहेत. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) बुधवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि स्वायत्त मंडळांच्या पदांवर विविध मातब्बरांची नियुक्ती केली. या नियुक्त्या चार वर्षांसाठी आहेत. वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वीही आयोगात कार्यरत होते, तर  तिरुवनंतपूरम येथील  चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. संजय बिहारी यांची वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे संचालक (ऑन्कॉलॉजी विभाग) डॉ. अनिल डिक्रूझ यांची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने टाटा मेमोरियल सेंटर येथील एमेरिटस प्राध्यापकपदावर कार्यरत असणारे  डॉ. राजेंद्र बडवे यांची पदवी-पूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अर्धवेळ सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. ते ७० वर्षे वयापर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर होईल, तोपर्यंत ती लागू राहील, असे जाहीर केले आहे. 

एनएमसी काय आहे? राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या कार्यभारावर लक्ष ठेवण्याचे काम करतो. तसेच आयोगाने केलेले सर्व नियम आणि सूचना या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी बंधनकारक असतात. वैद्यकीय अभ्यासक्रमात आणि परीक्षांमध्ये काही बदल करावयाचे असल्यास ते काम आयोग करतो. वैद्यकीय महाविद्यालयांची नियमित तपासणी आयोगाकडूनच केली जाते. महाविद्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आयोगाला अधिकार आहेत.

डॉ. राजेंद्र बडवेडॉ. बडवे गेली १५ वर्षे टाटा मेमोरिअल सेंटरचे मुख्य संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चार दशकांपासून टाटा हॉस्पिटलच्या सेवेत असलेले डॉ. बडवे  गेल्यावर्षी दि.  ३० नोव्हेंबरला निवृत्त झाले.

डॉ. अनिल डिक्रूझडॉ. डिक्रुझ यांनीही टाटा मेमोरियल  हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी मोठा काळ रुग्णसेवेसाठी दिला आहे. सध्याच्या घडीला  ते अपोलो रुग्णलयाच्या कर्करोग विभागाचे संचालक म्हणून काम पाहत आहे.