Join us

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 8:18 PM

डॉ. पंडीत विद्यासागर यांचा कार्यकाळ दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचेकडे

अंधेरी (प.) - मुंबई येथील राजीव गांधी तंत्रज्ञान संस्थेचे प्राचार्य डॉ. उद्धव भोसले यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडाविद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी एका आदेशानुसार डॉ. उद्धव भोसले यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.   

डॉ. पंडीत विद्यासागर यांचा कार्यकाळ दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ. उद्धव वेंकटराव भोसले (जन्म २४ जानेवारी १९६७) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून इलेक्ट्रोनिक्स विषयात बी.ई. तसेच एम.ई. केले असून आयआयटी मुंबई येथून ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. गोव्याच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे (National Institute of Technology)संचालक डॉ. गोपाल मुगेराया तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग हे समितीचे अन्य सदस्य होते. 

टॅग्स :विद्यापीठमराठवाडाशिक्षण