मुंबई/ चंद्रपूर: कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्तींच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या श्रमश्री बाबा आमटे या कर्मयोग्याने उभारलेल्या आनंदवनात सोमवारी एका अकल्पित घटनेने शोककळा पसरली. बाबा आमटे यांची नात व डॉ. विकास व भारती आमटे यांची कन्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल गौतम आमटे-करजगी (वय ३९) यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. शीतल आमटे यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शीतल आमटे यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा माध्यमांनी प्रयत्न केला. मात्र, दिगंत आमटे फार काही बोलले नाहीत. आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही, इतकंच बोलून हात जोडून दिगंत आमटे निघून गेले.
कौटुंबिक कलह आणि संस्थेतील वादामुळे डॉ. शीतल आमटे या गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होत्या, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात दिलेल्या योगदानाची दखल घेतानाच त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे आमटे कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. मिळालेल्या माहितीनूसार, सोमवारी सकाळी डॉ. शीतल यांचे पती गौतम आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डॉ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डॉ. शीतल बेशुद्धावस्थेत पडलेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डॉ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.
आनंदवनातील आनंद मावळला
डॉ. शीतल आमटे यांचे पहिली ते १० वी पर्यंतचे शिक्षण वरोरा येथे झाले. ११ ते १२ वीचे शिक्षण आनंदनिकेतन महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. कर्मयोगी बाबा आमटे यांचा वसा तिसऱ्या पिढीच्या रूपाने त्या चालवीत होत्या. पुणे येथील करजगी परिवारातील गौतम करजगी यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना सहा वर्षाचा शर्वील नावाचा मुलगा आहे. २०१७ पासून डाॅ. शीतल महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्यकार्यकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम करजगी आनंदवनात अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आनंदवनात मुख्य व्यवसाय शेती असून यासोबतच दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, हातमाग सतरंज्या तयार करणे, कपाट तयार करणे, तीनचाकी सायकल तयार करणे, या वर्कशाॅपमध्ये साहित्य तयार केले जात. या सर्व बाबींवर डॉ. शीतल कार्य करीत होत्या. आनंदवनात कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्ती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
कोरोना योद्धा म्हणून सत्कार
डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी प्रशासनाने कोरोना विषाणू विरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे यांनी सामील होऊन कार्य केले. या कार्याबाबत १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला होता.