लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परळ येथील डाॅ. शिरोडकर मुंडईच्या पुनर्वसनानंतर येथील मासे, अंडी आणि मटण विक्रेत्यांना नव्या इमारतीत मूळ ठिकाणी जागा देण्याबाबत लेखी आदेश काढून आश्वस्त करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मनसेच्या नेतृत्वाखाली कोळी महिल्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली होती.
शिरोडकर मंडईच्या दुसऱ्या फेजचे बांधकाम सुरू होत आहे. इथे वर्षानुवर्षे मासे विक्री करणाऱ्या कोळी बंधू भगिनींच्या मासे विक्रीचा व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात शिरोडकर मंडई पहिल्या फेजमधील इमारतीच्या तळघरात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, ही जागा वयस्क विक्रेते आणि ग्राहकांसाठी गैरसोयीचे आहे. भौगोलिक रचनेमुळे पावसाळ्यात तळघरात पाणी साचण्याचाही धोका आहे. शिवाय, ११४ मासे विक्रेते आणि ४० मटण-अंडी विक्रेत्यांसाठी ही जागा अपुरी पडत. मंडईच्या पुनर्विकासानंतर सर्व कोळी बांधवांना नवीन इमारतीत पुन्हा जागा मिळेल की नाही, याबाबतही साशंकता असल्याने कोळी महिलांच्या शिष्टमंडळाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे समस्या मांडली.
त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे विभाग अध्यक्ष नंदकुमार चिले उपविभाग अध्यक्ष संतोष नलावडे, चेतन पेडणेकर, शाखा अध्यक्ष नीलेश इंदप, संतोष सावंत, नीलेश पोळेकर यांच्यासह कोळी महिलांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. पुनर्वसनाबाबत चर्चा करतानाच मासे-मटण- अंडी विक्रेत्यांना नवीन इमारतीत मूळ ठिकाणी जागा देण्याची लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. यावर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश काढून कोळी बांधवांना आश्वस्त केले. तसेच या सर्व कोळी बांधवांच्या बैठकीची जागा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.