Join us

डॉ. सुनील कुलकर्णीवर अखेर गुन्हा दाखल

By admin | Published: April 21, 2017 3:55 AM

शिफू संस्कृती’चा प्रशिक्षक डॉ. सुनील कुलकर्णी याच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : ‘शिफू संस्कृती’चा प्रशिक्षक डॉ. सुनील कुलकर्णी याच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली बंदर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना ‘शिफू संस्कृती’चे शोधक डॉ. सुनील कुलकर्णी याने आपल्या जाळ्यात ओढले. त्यामुळे त्यांनी स्वत:चे घरही सोडले, अशी तक्रार करण्यासाठी पालक मालाड पोलीस ठाण्यात गेल्या डिसेंबर महिन्यात गेले होते. डॉ. कुलकर्णी ‘सेक्स आणि ड्रग्ज’ रॅकेट चालवत असल्याचा त्यांचा आरोप होता. डॉ. कुलकर्णी सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटांतील मुलींशी संपर्क साधून त्यांचे ब्रेन वॉश करतो. त्यामुळे या मुली स्वत:च्या बुद्धीचा वापर न करता डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणेच वागतात. मृणाल गोरे दक्षता समितीने डॉ. कुलकर्णी राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील फ्लॅटमध्ये भेट दिली तेव्हा अनेक तरुण-तरुणी त्यांना अर्धनग्न स्थितीत आढळले. यात या दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश होता, असा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दोन्ही मुली सज्ञान आहेत. आई-वडिलांशी पटत नसल्याने वेगळे राहत असल्याचे त्यांनी सांगितल्याने मालाड पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. इतक्या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल करत चौकशी का नाही केली, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यानंतर बुधवारी न्यायालयाच्या निर्देशानुसार मालाड पोलिसांनी डॉ. कुलकर्णीला अटक केली. त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)