मुंबई : आत्महत्येपूर्वी डॉ. पायल तडवी हिने सुसाइड नोट लिहून ठेवली असल्याचा अंदाज वर्तवित, ती आरोपींनी लपविल्याचा संशय गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे. या दिशेने अधिक तपास सुरू आहे.
२२ मे रोजी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत पायल वसतिगृहाच्या खोलीत होती. त्या दरम्यान तिने सुसाइड नोट लिहून ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही.तिने आत्महत्या केल्याचे समजताच, अटक आरोपींपैकी डॉ.भक्ती मेहरे आणि डॉ. हेमा अहुजा घटनास्थळी पोहोचल्या. त्या पाठोपाठ डॉ.अंकिता खंडेलवाल तेथे आली. त्यांनीच ती सुसाइड नोट काढून घेतल्याचा संशयही गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे. त्यात तिघीही एकसारखीच माहिती देत असल्याने, ते कोणीतरी शिकविल्यासारखे जबाब देत असल्याचेही गुन्हे शाखेने नमूद केले.
या प्रकरणी गुन्हे शाखेला अटक आरोपींकडे चौकशी करायची होती. मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने, ते अन्य बाबींच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तडवी प्रकरणाशी संबंधित डॉक्टर, विद्यार्थिनींसह रुग्णांकडेही ते अधिक तपास करत आहेत. पायल हिच्या आई-वडिलांसह पती सलमान यांच्या नव्याने नोंदविण्यात आलेल्या जबाबातही नवीन आरोप समोर आलेले नाहीत.
सरकारी वकील बदलाडॉ. पायल तडवी प्रकरणात सरकारने दिलेल्या विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांना त्वरित बदलण्याची मागणी भीम आर्मीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले असून, तपास अपूर्ण असताना आरोपींना पुन्हा पोलीस कस्टडीची आवश्यकता असताना, सरकारी वकील ठाकरे यांनी न्यायालयात फिर्यादीची बाजू भक्कमपणे न मांडल्याने, आरोपींना पोलीस कस्टडीऐवजी नायायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे त्यांच्या जमिनाचा मार्गही मोकळा झाला आहे, असा दावा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे या राजा यांच्या जागी तज्ज्ञ वकिलाची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.