Join us

कामजीवनाबाबत समुपदेशन करणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 1:27 PM

 कामजीवनाबाबत समुपदेशन करणारे, कामजीवनाबाबतच्या विविध समस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

मुंबई -  कामजीवनाबाबत समुपदेशन करणारे, कामजीवनाबाबतच्या विविध समस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. प्रभू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना जावई असा परिवार आहे. दादर येथील स्मशानभूमीत बुधवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहसा खुलेपणाने बोलल्या न जाणाऱ्या कामजीवनाबाबतच्या समस्यांबाबत त्यांनी विपूल लिखाण केले. त्यापैकी निरामय कामजीवन, यौवन ते विवाह ही त्यांची पुस्तके गाजली होती. गोष्ट एका डॉक्टराची या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्रही लिहिले. तसेच स्नेहबंध या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकामधून त्यांनी पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी यांचे व्यक्तिचित्र रेखाटले होते. डॉ. प्रभू यांनी लिहिलेले निरामय कामजीवन हे पुस्तक याविषयावरील आधीच्या पुस्तकांपेक्षा दर्जेदार असल्याचे मानले गेले आहे. 1982 साली पहिली आवृत्ती आलेल्या या पुस्तकाची सध्या 34 वी आवृत्ती बाजारात आली आहे. डॉ. प्रभू हे कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड (इंटरनॅशनल) या संस्थेचे मानद सदस्य होते. तसेच इतर विविध संस्थांमध्येही त्यांनी काम पाहिले होते.   

टॅग्स :मृत्यूदादर स्थानक