डॉ. तात्याराव लहाने यांनी सोडले जे. जे.चे डीनपद!
By अतुल कुलकर्णी | Published: October 6, 2017 05:51 AM2017-10-06T05:51:51+5:302017-10-06T05:52:39+5:30
जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी अचानक अधिष्ठाताचे पद सोडले असून डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुत्रे दिली आहेत.
मुंबई : जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी अचानक अधिष्ठाताचे पद सोडले असून डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुत्रे दिली आहेत. डॉ. लहाने यांची सहसंचालक म्हणून बढतीवर बदली करण्यात आली होती. त्याचा पदभार त्यांनी स्वीकारला होता. पण जे.जे.तील कारभार सुरळीत चालावा म्हणून डॉ. लहाने यांना पुढील आदेश येईपर्यंत या पदावर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
डॉ. लहाने आता सहसंचालक म्हणून काम करत असले तरी ते नेत्र विभागात काम करणार की नाही, या विषयी कोणतीही स्पष्टता वैद्यकीय शिक्षण विभागाने केली नाही. त्यामुळे रोज शेकडोंनी डोळ्यांची आॅपरेशन जे.जे.मध्ये होतात त्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे.जे.मधील डॉक्टरांच्या अंतर्गत वादाची किनार या सगळ्याच्या मागे आहे, असे बोलले जाते. तर ज्येष्ठ डॉक्टरांना मिळणारी वागणूकही यामागे असल्याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. लहाने यांनी ११ फेब्रुवारी २०१० रोजी पदभार घेतला होता. साडेसात वर्षांच्या काळात त्यांनी बंद अवस्थेतील आयसीसीयु, एमआयसीयु सुरू केले. एचएमआयएसचा पायलट प्रोजेक्ट सुरू करून सर्व रूग्णांची नोंदणी, तपासण्या व केलेले उपचार संगणकाच्या एका क्लिकवर मिळू लागले. पंतप्रधान स्वास्थ्य योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून २० कोटी रूपयांत ७ मजली प्रशासकीय इमारतीचे रखडलेले बांधकाम सुरू करून पूर्ण केले. तसेच १०० कोटींची अर्धवट राहीलेली कामे पूर्ण करून त्यांनी जे. जे.चा कायापालट केला. एमएमआरडीएकडून ४३ कोटी रुपये मिळवून, थ्री टेसला एमआरआय सारख्या अत्याधुनीक यंत्राची भर टाकली. त्यातूनच त्यांनी सेंट जॉर्जेस रूग्णालचाही कायापालट केला. जे.जे.मध्ये जेथे वर्षाला ५ लाख रुग्ण येत होते ती संख्या आता दरवर्षी
१० लाख रुग्ण एवढी झाली आहे आणि दरवर्षी जेथे १६ हजार शस्त्रक्रिया होत होत्या त्या आता ३० हजारावर गेल्या आहेत.