Join us

दरोडा ‘स्पेशल २६’ स्टाईल

By admin | Published: March 18, 2015 1:10 AM

दरोड्यासाठी आरोपींनी पेढीजवळच एक रूम भाड्याने घेतली. तिथेच दरोड्याची २० ते २५ वेळा तालीमही केली. त्यातील एकनाथ पष्टे पोलीस अधिकारी झाला.

दरोड्यासाठी आरोपींनी पेढीजवळच एक रूम भाड्याने घेतली. तिथेच दरोड्याची २० ते २५ वेळा तालीमही केली. त्यातील एकनाथ पष्टे पोलीस अधिकारी झाला. दोघे ‘आरोपी’, दोन कर्मचारी, तर एक खबऱ्या बनला. डोंबिवलीच्या ‘कस्तूरी प्लाझा’ येथून त्यांनी गाडी भाड्याने घेतली. नंतर घोटीजवळ चालकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून इगतपुरी घाटात सोडले. याच गाडीचा क्रमांक बदलून त्यांनी तिचा वापर केला. दरोड्यासाठी जाताना मोबाइल बाळगले नाहीत. आपली नावेही बदलली. सांकेतिक भाषेतच बोलायचे ठरले. झवेरी बाजारातून शूटिंगचे बनावट रिव्हॉल्व्हर घेतले होते. पोलीस असल्याची बतावणी करीत छापा टाकण्यासाठी बनावट सर्च वॉरन्टची प्रतही सोबत होती. सत्यघटनेवर आधारित ‘स्पेशल २६’ या अक्षयकुमारच्या चित्रपटावरून प्रेरणा घेत पोलिसांच्या वेषात नाशिकची सराफी पेढी लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा छडा लावल्याने अखेर ‘कानून के हात लंबे होते हंै’ याचीच प्रचिती गेल्यावर्षी डोंबिवली पोलिसांनी केलेल्या तपासावरून आली. दरोड्याच्या वेळी कोणीही मोबाइल वापरायचा नाही, यासारखी लहानसहान खबरदारी दरोडेखोरांनी घेऊनही पोलिसांनी टोळीकडून सुमारे सव्वाचार कोटींचे १४ किलो सोने आणि २६ लाखांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला. चंद्रशेखर (२९) आणि राजदत्त राणे (३३) ही दोन्ही सख्खी भावंडे. चंद्रशेखरने संगणक दुरुस्तीचे शिक्षण घेतले होते. त्याच्यावर डोंबिवलीत चोरीचे गुन्हे दाखल होते. राजदत्त एका बॅन्जो पार्टीत होता. चोरीचे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी चंद्रशेखर २००८ मध्ये नाशिकला निघून गेला. मुंबईत १९८७ साली त्रिभुवनदास झवेरीच्या पेढीत बनावट पिस्तुलाच्या धाकाने ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांच्या वेषातील टोळीने दरोडा घातला होता. याच घटनेवर आधारित ‘स्पेशल २६’ हिन्दी चित्रपट चंद्रशेखरने पाहिला आणि एखाद्या ज्वेलर्सवर असाच दरोडा टाकण्याची कल्पना त्याला सुचली. चित्रपटातील कथेप्रमाणेच त्याने पोलिसांची वर्दी, पिस्तूल आणून घरातच अ‍ॅक्टिंगही सुरू केली. नाशिकची एक सराफी पेढी लुटण्याची कल्पना त्याने डोंबिवलीतील दीपक दळवी या मित्राला सांगितली. त्याने रूपेश रणपिसे, जीवन सिंह आणि कार्तिक देवेंद्र यांची मदत घेण्याचे ठरविले. लुटीनंतर प्रत्येकी पाच लाख रुपये किंवा लुटीतील सारखी वाटणी असे पर्याय ठेवल्यानंतर पाच लाखांच्या रकमेवर सर्वांचे एकमत झाले. नाशिकच्या पेढीतील व्यवस्थापकाच्या घरी चंद्रशेखरने संगणक दुरुस्तीचे काम केले होते. त्यातून त्याने पेढीतील बरीचशी माहिती मिळविली होती. २ आॅक्टोबर २०१३ रोजी पेढीच्या सुरक्षारक्षकाचे रिव्हॉल्व्हर सर्व्हिसिंगला दिले होते. त्याच दिवशी त्यांनी दरोड्याची योजना आखली. पेढीत दोन महिला, एक पुरुष कर्मचारी तर चौथा रखवालदार असून, त्याची रायफल बिघडल्याची खात्री त्यांनी केली. सायंकाळी ५.४५ वाजता दुकान बंद करण्याचा शिरस्ता, या सर्व बाबी त्यांनी हेरल्या. प्रत्यक्ष दरोड्याच्यावेळी ‘आरोपी’ म्हणून तोतया पोलिसांसोबत आलेल्या त्यांच्यातीलच एकाने आपण याच पेढीत चोरीचे सोने गहाण ठेवल्याचे सांगितले. तर ‘खबऱ्या’ने हेच ठिकाण असल्याचे दाखविल्यावर तोतया उपनिरीक्षकाने खड्या आवाजात झडतीचे फर्मान सोडले. बंदुकीच्या धाकामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांनी या तोतया पोलिसांकडे १७ किलो सोने आणि ३.२० लाखांची रोकड सोपविली. लुटारूंनी दुकानातील फोन आणि सीसीटीव्हीची वायर तोडून पलायन केले. पळाल्यानंतर अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावरच आधीच भाड्याने घेतलेल्या खोलीत ते राहिले. याप्रकरणी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. इतकी मोठी लूट असल्याने पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली, पण त्याचा उपयोग झाला नाही. दरोड्यानंतर ठरल्याप्रमाणे दीपक, रूपेश आणि जीवन या तिघांना चंद्रशेखरने प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. कार्तिक आणि त्याची भेटच झाली नाही. दरम्यान, हा दरोडा १२ कोटींचा असल्याची बातमी चॅनेलवर झळकली. म्हणजेच प्रत्येकी मिळालेला अवघा पाच लाखांचा वाटा अगदीच तुटपुंजा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांच्यात वाद सुरू झाले. तोपर्यंत त्यांचे पैसे छानछौकीमध्ये संपले. ज्याने दरोड्यासाठी तयार केले त्या दीपकलाच इतर आरोपींनी मारहाण केली. त्याला दुचाकीवरून खाडीत टाकण्यासाठी रूपेश आणि जीवन निघाले होते. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत दीपक कोपर पोलीस चौकीत शिरला. चौकशीत नाशिकचा दरोडा आपण कार्तिक, एकनाथ पष्टे, चंद्रकांत आणि राजदत्त यांच्या मदतीने टाकल्याची कबुली त्याने दिली. नाशिक दरोड्याचा धागा हाती लागला तरी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर आणि राजदत्त यांचा ठावठिकाणा सापडत नव्हता. दरोड्यातील ऐवजही मिळाला नव्हता. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी, डोंबिवलीचे साहाय्यक आयुक्त राजन घुले आणि विष्णू नगरचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी तपास करीत अखेर चंद्रशेखरलाही शिताफीने अटक केली. या दरोड्यात पोलिसांचाच हात असल्याच्या शक्यतेमुळे तपास लागत नसल्याचा आरोप होत होता. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागणे पोलिसांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे झाले होते. दरोड्याचा तपास लावणाऱ्या राजेंद्र कुलकर्णी यांच्या पथकाला ठाणे पोलीस आयुक्तालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी एक लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. याव्यतिरिक्त पेढीच्या मालकाने तपास पथकातील सहा जणांना सहा लाखांचे बक्षीस देऊ केले. मात्र नियमाप्रमाणे ते त्यांना देता येत नसल्यामुळे ते शासनाकडे जमा करण्यास सांगण्यात आले. तसे करण्यास नकार दिल्याने ते ‘बक्षीस’ आणि शासनाचे एक लाख रुपये या पथकाला अद्यापही मिळालेले नाहीत. १ चंद्रशेखरने नाशिकमध्ये संगणकाचे दुकान सुरू केले होते. तिथे एक नॅनो कार असलेली त्याची एक मैत्रीण नेहमी येते, इतकीच माहिती त्यांच्या हाती लागली. मग तिथल्या नॅनो वितरकाकडून कार खरेदी करणाऱ्यांची यादी त्यांनी मिळविली. त्यातला एक फोटो पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्तिकने ओळखला. पत्ता बदललेला असूनही या पथकाने तिला शोधले. चंद्रशेखरकडे मोबाइलही नसतो. मात्र तो आईला भेटायला हायवेजवळील एका नऊ मजली इमारतीत येतो, ही माहिती तिच्याकडून मिळाली. २दोन दिवसांनी म्हणजे ४ जानेवारी २०१४ रोजी रात्री हे पथक या इमारतीखाली दबा धरून बसले असताना एक कार तिथे आली. त्यातील चंद्रशेखरला पोलिसांची चाहूल लागताच त्याने खालूनच आईला फोन करून पोलीस आले होते का, असे विचारले. ‘नाही’ असे उत्तर मिळाल्यावर तो घरी गेला. त्याच्यापाठोपाठ पोलीस पथकही घरात शिरले. सुरुवातीला त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. तेव्हा चौघा साथीदारांना पकडल्याचे पथकाने त्याला सांगितले. वितळवून घरातच लगड करून ठेवलेले सोने आणि रोकड, दोन टॉयगन, दोन चॉपरही हस्तगत केले. याशिवाय अटकेच्याच दिवशी त्याने खरेदी केलेल्या ३६ लाखांच्या दोन कारही पोलिसांच्या हाती लागल्या.३या दरोड्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगलेल्या चंद्रकांत आणि त्याचा भाऊ राजदत्तलाही पोलिसांनी जेरबंद केले. उच्चभ्रू वस्तीत ते वास्तव्याला होते. रेकॉर्डवरही नाव नसल्यामुळे त्यांना पकडणे एक आव्हानच होते. एकनाथ पष्टे वगळता सर्वच आरोपी पकडले गेले. पष्टे अजूनही पसार आहे. अटक केलेल्या सहापैकी चंद्रशेखर, राजदत्त आणि कार्तिक हे तिघे कारागृहात आहेत, तर उर्वरित तिघे जामिनावर सुटले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घाटगे, मोहन खंदारे, आबा पाटील, हवालदार एम. बी. घाडगे, आर. के. घोलप, डी. बी. मोरे आणि बी. एस. जाधव आदींचे पथक तयार करण्यात आले.