सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर 

By सचिन लुंगसे | Published: February 6, 2024 12:24 PM2024-02-06T12:24:25+5:302024-02-06T12:24:50+5:30

Mumbai News: सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊनच बांधले जावे, या हेतूने महारेराने या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या ( Model guidelines) आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे.

Draft Order on Model Guidelines for Housing Projects for Retired and Senior Citizens announced | सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर 

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर 

मुंबई - सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊनच बांधले जावे, या हेतूने महारेराने या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या ( Model guidelines) आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. हा आदेश लागू झाल्यानंतर विकासकांना या तरतुदींचा विक्रीकरारात ( Agreement for Sale) यथायोग्य पध्दतीने समावेश करावा लागेल. हे विशिष्ट प्रकल्प या आदर्श मार्गदर्शक तत्त्वानुसारच बांधावे लागतील. त्यासाठी हा मसुदा महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून याबाबत सूचना आणि मते  suggestions.maharera@gmail.com या इमेलवर 29 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे  आवाहन महारेराने केले आहे.

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या प्रकल्पाच्या चुकीच्या पद्धतीने जाहिराती सध्या वर्तमानपत्रातून येत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आणण्यात आले आहे . यातून संबंधित गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची शक्यता असून त्यातून मूळ हेतूच साध्य होणार नाही.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ( Ministry of Housing and Urban Affairs) याबाबतची आदर्श मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी केलेली आहेत. राज्यांच्या विनियामकांनी त्यांच्या राज्यात याबाबत उचित पावले उचलावी असे त्यांनी सुचविले आहे. यानुसार महारेराने यात ज्येष्ठांच्या गरजांनुसार  इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा सांगोपांग विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. इमारतीचे संकल्पचित्र (Design of Building),  हरित इमारत तत्वे    (Green Building Principles), उद्वाहन आणि रॅम्पस ( Lifts and Ramps), जिना (  Staircase), अनेक सदनिकांना जोडणारा छिन्नमार्ग ( Corridor),  प्रकाश योजना आणि हवा खेळती ठेवण्यासाठी वायुवीजन (Lighting and Ventilation) सुरक्षा आणि सुरक्षितता ( Safety and Security ) याबाबत कुठल्या बाबतीत कशी काळजी घ्यावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन मसुद्यात करण्यात आले आहे . हे सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित  सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात, हा महारेराचा हेतू आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विनियामक तरतुदी करण्याबाबत पुढाकार घेणारे महारेरा हे पहिलेच प्राधिकरण आहे.
 
यातील काही महत्त्वाच्या तरतुदी अशा..
- एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट असावी. 
- इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर सुध्दा कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन असावे. 
- आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजेही 900 एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच.
- दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे. यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे. 
- सर्व लिफ्टला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या लिफ्टमध्ये व्हीलचेअर  सहजपणे आतबाहेर करता यावी.
- जिन्यांची रुंदी 1500 एमएम पेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजुला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये. 
- दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही 12 पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.
- इमारतीच्या काॅरिडाॅरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी.
जेथे जेथे छिन्नमार्गाच्या पातळीत फरक असेल तो भाग सहजपणे लक्षात येईल अशा ठळक रंगाने दाखवावा. 
- भिंतीलगत  गरजेनुसार विशिष्ट उंचीवर  हँडल्सही असावेत .
- स्वयंपाकघरात गॅस प्रतीरोधक यंत्रणा असावी. 
- स्नानगृहात सहजपणे पकडता येईल अशा हँडल्ससह वाश बेसीन असावे. हँडल्स दणकट असावेत. न घसरणाऱ्या टाईल्स असाव्यात. शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा. 
- विजेची पर्यायी व्यवस्था असावी . 
- सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अशा अनेक महत्वाच्या तरतुदी यात  सुचविण्यात आलेल्या आहेत.
 
सेवानिवृत्त, ज्येष्ठांसाठीचेच गृहनिर्माण प्रकल्प, ही बदलत्या समाजाची गरज  होत चाललेली आहे. ही गरज भागविण्यासाठी अनेक विकासक असे प्रकल्प जाहीर करीत आहेत.  परंतु या वर्गाच्या विशिष्ठ अशा अगदी प्राथमिक गरजा लक्षात घेऊन ही बांधकामे होताना दिसत नाही. म्हणून सेवानिवृत्त/ज्येष्ठांची होऊ शकणारी फसवणूक आणि भ्रमनिरास टाळण्यासाठी महारेराने अशा विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांचा मसुदा जाहीर केला आहे. लवकरात लवकर या तत्त्वांना अंतिम स्वरूप देऊन ती काटेकोरपणे लागू करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे.
- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Web Title: Draft Order on Model Guidelines for Housing Projects for Retired and Senior Citizens announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.