Join us

सुखाच्या संसारासाठी रचला दरोड्याचा डाव

By admin | Published: September 01, 2016 4:03 AM

मालकिणीच्या घरात दरोडा टाकून मिळालेल्या पैशात लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या मोलकरणीचा डाव अंबोली पोलिसांनी हाणून पडला.

मुंबई : मालकिणीच्या घरात दरोडा टाकून मिळालेल्या पैशात लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या मोलकरणीचा डाव अंबोली पोलिसांनी हाणून पडला. मित्राच्या मदतीने तिने माजी पत्रकार असलेल्या तिच्या मालकिणीसह कुटुंबाला चार तास कोंडून ठेवले. या प्रकरणी मंगळवारी रात्री पोलिसांनी चौघांना अटक केली.शियान खान, बालकृष्ण उर्फ रवी, बरसा आणि समीर खान अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. यातील दोघे नवी मुंबईचे राहणारे आहेत. पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने त्यांना अटक केल्याचे अंबोली पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील तक्रारदार माजी पत्रकार असलेल्या सुमन दास या अंबोली परिसरात त्यांचे पती बॉबी दत्ता, आई ओली दास आणि तीन वर्षीय मुलीसोबत राहतात. त्या आणि त्यांच्या पतीचे प्रॉडक्शन हाउस आहे. काही कामास्तव बॉबी आसामला गेले होते, तर सुमन या त्यांच्या मैत्रिणींसोबत जेवण्यासाठी बाहेर गेल्या. त्यामुळे घरात त्यांची आई, मुलगी आणि मोलकरीण बरसा होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास समीर त्याच्या एका साथीदारासह दास यांच्या घरी कुरिअर बॉय बनून गेला. बारसाने दरवाजा उघडताच हे दोघे घरात शिरले. घरात शिरल्यावर बेडरूममध्ये असलेल्या ओली यांचे तोंड उशीने दाबत त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर कपाटातील अठरा हजार काढून त्यांनी ओली यांचे एटीएम कार्ड हिसकावले, जे त्यांनी इमारतीखाली थांबलेल्या साथीदारास देऊन त्यातून तीस हजार रुपये काढले. जवळपास सव्वापाचच्या सुमारास सुमन या घरी परतल्या. तेव्हा त्यांना दरवाजा उघडून दास घरात घेत, त्यांनी त्यांचे डोके भिंतीला आपटले. याच दरम्यान बॉबी सतत दास यांना फोन करत होते. मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने अखेर त्यांनी त्यांच्या कारचालकाला फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यालाही समीरने आत घेऊन बांधून ठेवले. ही बाब सुमन यांच्या पतीमार्फत अंबोली पोलिसांना समजली. त्यानुसार, त्यांनी चौघांना अटक करत त्यांच्याकडून जवळपास अठ्ठेचाळीस हजारांची रोख आणि पिस्तूल हस्तगत केले आहे.