नालेसफाईचं कंत्राट कोट्यवधी, प्रत्यक्षात १० टक्केही काम नाही; भाजपाचा गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 01:40 PM2022-07-20T13:40:40+5:302022-07-20T13:41:28+5:30
कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप भाजपानं केला.
मुंबई - राज्यातील सत्तानाट्यानंतर आता भाजपानं पुढील लक्ष मुंबई महापालिका निवडणुकांवर ठेवले आहे. मागील २५ वर्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेतील कारभारावर भाजपाकडून प्रामुख्याने टीकेची झोड उठणार आहे. त्यात आता पावसाळ्यामुळे नालेसफाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुबंईचे भाजपा आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून शहरातील अपूर्ण नालेसफाईबाबत तक्रार दिली आहे. योगेश सागर यांनी पत्रात म्हटलंय की, मुंबई शहरात गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील नालेसफाईची पोलखोल झालेली आहे. मुंबईत शहरातील सर्वच नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचला असल्यामुळे पाण्याचा निचरा झालेला नाही. यावर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे ८३.९ कोटी तसेच छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे १०२.३५ कोटी एवढा खर्च करूनही नाल्यांची विदारक स्थिती पाहता १० टक्के देखील नालेसफाई झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई शहरातील अपूर्ण नालेसफाईची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. जो पर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही तो पर्यंत संबंधित कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारच्या देयकाचे अधिदान करण्यात येऊ नये. तरी याबाबत तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा मुंबईकरांच्या हितासाठी भारतीय जनता पक्षामार्फत जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा आमदार योगेश सागर यांनी आयुक्तांना दिला आहे.