ड्रेनेज रस्त्यांची समस्या
By admin | Published: July 2, 2015 10:48 PM2015-07-02T22:48:21+5:302015-07-02T22:48:21+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या वॉर्ड क्र.२४, काळातलाव या प्रभागाला विशेष महत्त्व आहे. या प्रभागात असणाऱ्या काळातलावाशी दिवंगत शिवसेनाप्रमुख
अरविंद म्हात्रे, चिकणघर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या वॉर्ड क्र.२४, काळातलाव या प्रभागाला विशेष महत्त्व आहे. या प्रभागात असणाऱ्या काळातलावाशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भावनिक नाते होते. त्यांच्या इच्छेनुसारच काळातलावाचे ‘भगवा तलाव’ असे नामकरण झालेले असून या तलावाचा विकास सुशोभीकरणाद्वारे बाळासाहेबांच्या इच्छेनुसारच झालेला आहे. याचबरोबर जुने राममंदिर आणि काळी मशीद अशी दोन्ही धर्मीयांची श्रद्धास्थानेही या प्रभागात आहेत, म्हणून हा प्रभाग ऐतिहासिक मानला जातो. असे असूनही या प्रभागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना पायाभूत असुविधांचा सामना करावा लागत आहे. अंतर्गत गटारी, पायवाटा, रस्ते यांची अवस्था वाईटच आहे. काही ठिकाणी पेव्हरब्लॉक, टाइल्स लावल्याच गेल्या नसल्याने चिखल तुडवत चालावे लागते. काळातलाव ते कोतवाल चौकापर्यंत गटारींचे काम रखडत सुरू असल्याने रहदारीस अडथळा होत आहे.
या प्रभागात काळातलाव परिसर, राममंदिर परिसर, शक्ती बेतूरकर चौकासमोरील परिसर, न्यू मनीषानगर, विश्वकर्मा-गजानन महाराज मंदिर परिसर, खंडेलवाल कॉलनी आणि जुना ठाणकरपाडा गावठाण या परिसरांचा समावेश होतो. यात बहुसंख्येने बैठ्या चाळी आहेत. दोन चाळींच्या मागच्या गल्लीतली गटारे आणि गटारांत उगवलेल्या झाडांकडे ना नगरसेविकेचे, ना मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष, यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते.
ठाणकरपाडा गावठाणमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. बहुसंख्य भागात पायवाटाच नाहीत. यामुळे मातीच्या पायवाटांवर पावसामुळे चिखल आणि पाणी साठलेले असते. साफसफाईला कामगार येतच नाहीत. प्रभाग - १७ आणि प्रभाग - २४ यांची सीमा असलेल्या ठाणकरपाडा गावठाणसाठी अद्याप चांगला रस्ता बनू शकलेला नाही. प्रभाग - १७ मधील जैन शाळेजवळून नागेश सोसायटीमार्गे ठाणकरपाडा गावठाणजवळ आरसीसी रस्ता आलेला आहे.
मात्र, गावठाण भागात रस्त्याचे काम केलेले नाही. दोन प्रभागांच्या सीमेवरील २०० मीटर रस्ता रखडला आहे. प्रभाग दोन असले तरी मनपा एकच आहे. मग आम्हाला रस्ते, गटारे, पायवाटा का नाहीत, असा सवाल आहे. काळातलाव मच्छीमार सोसायटीसमोरून टेलिफोन एक्स्चेंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुना तबेला आहे. यामुळे शेणाची दुर्गंधी, डास याचा त्रास आहे. येथील वास्तव्यात प्रबोधनकार ठाकरे परिवाराला शिंगाडे खाऊन दिवस कंठावे लागले होते त्यामुळे त्यांचे या तलावाशी भावनिक नाते होते, तरीही या परीसराचे नष्टचर्य अद्याप संपलेले नाही.
काही ठिकाणी रस्ते, पायवाटा झाल्या नाहीत. कारण तेथील जमिनी खाजगी आहेत.ड्रेनेज ९५ टक्के पूर्ण झाले आहे. खाजगी जमीन मालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न आहे - समिधा सचिन बासरे, नगरसेवक प्रभाग -२४