मुंबई : गलेलठ्ठ पगार, बोनस आणि राहण्याची सोय अशा नोकरीच्या सुवर्णसंधीने त्यांना आकाश ठेंगणे झाले होते़ मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही़ पालिकेच्या बेपर्वाईमुळे अर्धवट उघड्या गटारात (मॅनहोल) पडून जखमी झालेले वांद्रे येथील विजय हिंंगोरानी (५१ वर्ष) यांना फ्रॅक्चर पाय, जीवघेण्या वेदना आणि उपचाराचा भुर्दंड पडला आहे. या मनस्तापासाठी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी त्यांनी पालिकेला नोटीस पाठविली आहे़ याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनीही याबाबत विभाग कार्यालयातून माहिती मागविली आहे़२९ नोव्हेंबर २०१५च्या मध्यरात्री कार्टर रोडवरून पायीच घरी जाताना हिंगोरानी यांचा पाय उघड्या गटारात अडकला़ या अपघातात त्यांच्या डाव्या पायामध्ये स्टीलचा रॉड बसवावा लागला आहे़ गेला दीड महिना रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही आणखी सहा महिने त्यांना घरीच आराम करावा लागणार आहे़ त्यामुळे बंगलोरच्या बहुराष्ट्रीय कंपनीत मिळालेल्या नोकरीवर १ जानेवारीपासून रुजू होणे त्यांना शक्य झाले नाही़ दरमहा अडीच लाख रुपये वेतनाची नोकरी गेल्याचे दु:ख त्यांना आहेच़ अद्यापही ते गटार असेच उघडे असल्याचे कळल्यावर त्यांनी पालिकेला नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोरानी यांच्या वकिलाने पालिका आयुक्त, एच विभागाचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्याला नोटीस पाठविली आहे़हा मुंबईकरांच्या जिवाशी खेळअशा अनेक घटना मुंबईत घडतात़ मात्र कोणीही पालिकेला जाब विचारायला जात नाही़ पालिका मुंबईकरांकडून कर वसूल करीत असते़ त्यामुळे चालण्यासाठी किमान सुरक्षित पदपथ निर्माण करणे ही पालिकेची जबाबदारी आहे़ या घटनेनंतरही अद्याप हे गटार अर्धवट उघडे असल्याने ही नोटीस पाठविल्याचे त्यांनी सांगितले़आयुक्तांनी मागविला अहवाल : या घटनेची गंभीर दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी एच विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडून माहिती मागवली असल्याचे सूत्रांकडून समजते़
उघड्या गटारामुळे नोकरीवर पाणी
By admin | Published: January 10, 2016 1:48 AM