मुंबई : जीर्ण आणि वाळवी लागलेल्या १९५६ पासूनच्या ते २०१३ पर्यंतची प्रमाणपत्रे आणि २०१० पासून ते २०१३ पर्यंतच्या सुमारे एक लाख ५४ हजार पाने असलेल्या नाटक आणि विविध कला प्रकारच्या संहितेचा खजिना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने जतन केला आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅनिंग आणि रसायनांची फवारणी करून जतन केली आहे.१९५६ पासून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची निर्मिती झाल्यापासून अनेक गाजलेल्या नाटकांच्या संहिता या कार्यालयात आहेत. परंतु यापूर्वी सरकारी ढिसाळ कारभारामुळे हजारो सहितांना वाळवी लागल्याने बहुतेक संहिता जीर्ण झाल्या होत्या. यामुळे गोण्या भरून ठेवलेल्या संहितेचे काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु यावर उचित कार्यवाही झाली नव्हती. २०१५ या वर्षापासून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने एका खासगी कंपनीच्या साहाय्याने १९५६ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे लेखकांना देण्यात येणारे ‘संहिता नोंदणी प्रमाणपत्र’ आणि २०१० ते २०१३ पर्यंतचे सुमारे एक लाख ५४ हजार पानांचे नाट्य आणि विविध कला प्रकारच्या संहिता स्कॅनिंग करण्यात आल्या. याशिवाय, प्रत्येक पानावर रसायन फवारण्यात आले. यासाठी तीन लाख रुपयांचा निधी लागल्याची माहिती परिनिरीक्षण मंडळाने दिली. आता या सर्व जुन्या संहिता आणि प्रमाणपत्र दस्तऐवज गोरेगाव चित्रनगरी येथील गोदामात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.दुसऱ्या टप्प्यातील जतनाचेही काम सुरू- २०१५ नंतरच्या दुसºया टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यात २०१५ पासूनच्या संहिता आणि २०१७ पासूनच्या संहिता प्रमाणपत्रांचे स्कॅनिंग करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यासाठीही तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.लवकरच अॅपचीही निर्मितीसॉफ्टवेअरच्या साहाय्याने अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅपमध्ये नाटकाचे नाव, लेखकाचे नाव, नोंदणी प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. याविषयीचा अंतिम निर्णय झाला असून अंमलबजावणीचे काम सुरू झाल्याची माहिती परिनिरीक्षण मंडळाचे सचिव संतोष खामकर यांनी दिली.
नाटक, कला प्रकारच्या संहितांचे होतेय जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:34 AM