नाट्य व्यवस्थापकांच्या जीवनाचे झाले ‘नाटक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:33+5:302021-06-04T04:06:33+5:30
काेराेनाचा फटका राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना, कोरोना प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा ...
काेराेनाचा फटका
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना, कोरोना प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. रंगमंचावरील कलाकार, पडद्यामागील कर्मचारी, तंत्रज्ञ, बुकिंग क्लार्क यांच्यासह नाट्य व्यवस्थापकांवरही याचा थेट परिणाम झाला आहे. रंगभूमीवर नाटक सुयोग्य पद्धतीने चालवण्यात नाट्य व्यवस्थापक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र त्यांच्या जीवनाचेच सध्या ‘नाटक’ झाल्याचे दिसून येत आहे. मराठी रंगभूमीवरील अशाच काही नाट्य व्यवस्थापकांनी सध्याच्या एकूणच स्थितीबद्दल मांडलेली ही भूमिका...
हलाखीची वेळ आली आहे - गोट्या सावंत, (अध्यक्ष, नाट्य व्यवस्थापक संघ)
नाट्य व्यवस्थापक या घटकाकडे शक्यतो कुणाचे लक्ष जात नाही. आमच्या व्यवस्थापकांवर लॉकडाऊनमुळे वाईट वेळ आली आहे. आमच्या व्यवस्थापकांना इतर कुठलाही जोडधंदा नाही. आता काही जण एखादा उद्योग सुरू करण्याच्या विचारात आहेत. मात्र एकूणच नाट्य व्यवस्थापकांवर सगळ्यात जास्त हलाखीची वेळ आली आहे. माझी राज्य सरकारला, नाट्य निर्माता संघांना, नाट्य परिषदेला विनंती आहे, की त्यांनी आमच्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. आमच्या भावनांचा विचार करावा. तूर्तास, लसीकरणाचे दोन डोस प्रत्येकाला मिळाल्यावर आणि त्याचा योग्य परिणाम दिसून आल्यावर नाटकाकडे प्रेक्षक वळू शकतील, असे मला वाटते.
पोटाला टाळे कसे ठोकायचे?
- प्रवीण दळवी (ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक)
१५-१५ दिवस करत करत दीड वर्ष झाले, तरी मारुतीच्या शेपटीप्रमाणे लॉकडाऊन वाढतच चालला आहे. आता तर पावसाळा तोंडावर आला आहे. नाटकाच्या प्रयोगांवर तसाही पावसाचा परिणाम होत असतो. हिवाळा व उन्हाळ्याच्या काळात जे कमवायचे, ते पावसाळ्यात पुरवून खायचे; अशी रीत आहे. सध्या तर हाताला काम मिळेल, याची काहीच शाश्वती नाही. लॉकडाऊनने राज्याला व देशाला टाळे ठोकले, तरी पोटाला टाळे कसे ठोकायचे; याचे उत्तर कुणाकडेच नाही. नाट्यप्रयोग सुरू होण्याची आम्ही वाट पाहतोय. अन्यथा कुटुंबाची होणारी उपासमार, डोक्यावर चढलेले कर्ज, बँकांचे हफ्ते आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतील. आम्हाला पैसे, अन्नधान्य याची मदत नको. फक्त सन्मानाने आमचे काम करू द्या.
शासनाने दखल घ्यायला हवी - प्रणीत बोडके (युवा नाट्य व्यवस्थापक)
गेले दीड वर्ष सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळामुळे नाट्यक्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. आता लॉकडाऊन पुन्हा १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. सर्व पूर्ववत कधी सुरू होईल, याची काही शाश्वती नाही. नाट्यगृहे जरी शेवटच्या टप्प्यात सुरू झाली, तरी त्याला अजून बराच अवकाश आहे असे वाटतेय. नाट्यक्षेत्रावर अवलंबून असलेले कलाकार, निर्माते, नाट्य व्यवस्थापक, डोअरकीपर, बुकिंग क्लार्क, इतर कामगार यांना सध्या कोणी वाली नाही. तरी शासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन काही उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. कारण हे क्षेत्र सुरू झाल्यावरही कितपत उभारी मिळेल ते माहीत नाही. दरवर्षी एप्रिल, मे व नोव्हेंबर, डिसेंबर असे चार महिने नाट्य व्यवसायासाठी चांगला काळ असतो. यंदाची परिस्थिती पाहता उन्हाळी सुट्टी आता संपली असून, वर्षअखेरचे दोन महिने आम्हाला मिळू शकतात; पण तोपर्यंत हा व्यवसाय सुरळीत होईलच असे काही सांगता येणार नाही.
लॉकडाऊनमुळे जगणे कठीण - शेखर दाते (ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक)
केवळ नाटकांवर अवलंबून असलेल्या नाट्य व्यवस्थापकांना महिन्याला दोन-चार प्रयोग मिळतात. ज्या व्यवस्थापकांकडे एखादेच नाटक असेल आणि महिन्याला त्याचे फक्त एक-दोन प्रयोग झाले, तर त्यांचे कसे होणार? सध्याच्या लॉकडाऊनमुळे तर जगणेच कठीण झाले आहे. दुसरा एखादा उद्योग करायचा म्हटला तरी भांडवल लागणार. सरकारने यात लक्ष घातले तर त्याचा फायदा होईल. व्यवस्थापकांना काही मदत दिली गेली, तर छोटा-मोठा उद्योग सुरू करता येईल. काही संस्था अन्नधान्याची मदत करीत आहेत, मात्र कुटुंबाचा इतर खर्चही असतोच. जरी नाट्यगृहे सुरू झाली तरी प्रेक्षकवर्ग नाटकांना येणे कठीण वाटते. कारण मध्यमवर्गाकडे सध्या आर्थिक चणचण आहे. सर्वांचीच कामे सुरू झाली, तर प्रेक्षक नाटकाकडे वळू शकतील. नाटकांना परवानगी मिळाल्यावर तिकीटदर कमी ठेवले, तर त्याचाही फायदा होईल.
-------------------------------------------------------------------------