ठाणे : नाट्यसंमेलन अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपले आहे. असे असूनही आयोजन समितीने अजून कार्यक्रमपत्रिकाच जाहीर केलेली नाही. कार्यक्रमांची घोषणा शनिवारी करण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष पालघरच्या पोटनिवडणुकीत गुंतल्याने ही पत्रकार परिषद रद्द झाली. त्यामुळे सोमवारी कार्यक्रमांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाचे स्वरूपच जाहीर न झाल्याने नाट्यप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटला आहे. ९६वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या तारखेबाबत बरीच चर्चा झाली. नंतर रसिकांचा सहभाग, संस्थांचा सहभाग पुरेसा नव्हता. त्यासाठी आणि संमेलनाच्या एकंदर आखणीसाठी पुन्हा पालकमंत्र्यांची वाट पाहत आयोजकांनी वेळ दवडला. त्यानंतर, काही दिवसांतच कार्यक्रमांचे स्वरूप ठरले. त्याचा सविस्तर कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार असल्याची घोषणाही झाली. पण, आयोजन समितीने स्वागताध्यक्ष नसल्याचे कारण पुढे करत अचानकपणे पत्रकार परिषद पुढे ढकलली. अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे यांच्या उपस्थितीत बुधवारी नाट्यसंमेलनाची बैठक दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पार पडली होती. त्यात कार्यक्रमाचे स्वरूप व वेळा निश्चित करण्यात आल्यानंतर शनिवारी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर होईल, असे मोहन जोशी यांनी सांगितले होते. संमेलन जरी १९ फेब्रुवारीपासून असले तरी आठवडाभर अगोदर म्हणजे १२ फेब्रुवारीपासून संमेलनापूर्वीचे कार्यक्रम सुरू होतील. पण, त्याचा आराखडा समोर येत नसल्याने कार्यक्रमात सहभाग नोंदविणारेही प्रतीक्षेतच आहेत. पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष पालघरच्या पोटनिवडणुकीत गुंतल्याने ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असून, सोमवारच्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमांची सविस्तर घोषणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांनाच मुहूर्त मिळेना
By admin | Published: February 07, 2016 2:31 AM