लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे शनिवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान वयाच्या ८८ वर्षी गोरेगाव येथील त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेली पन्नासहून अधिक वर्षे कमलाकर नाडकर्णी यांनी विविध वृत्तपत्रांमधून नाटकांचे समीक्षण केले. त्यांच्या लेखनाने वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षेला एक वजन आणि वलय प्राप्त झाले, हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. 'बहुरूपी' या संस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेसाठी कमलाकर नाडकर्णी यांनी इंग्रजी नाटकांचा अनुवाद केला होता. त्यावेळी त्यांनी नाट्यचर्चा आणि तत्सम परिसंवादात भाग घेतला.
त्यांनी गावोगावच्या शिबिरांमध्ये नाट्यप्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. नाटकांवरची व्याख्याने देत असताना नाडकर्णीनी एकांकिका-नाट्यस्पर्धांसाठी तसेच राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा २०१९ सालचा जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता. त्यांच्या परीक्षणांचे संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"