नाट्यसंमेलन आयोजकांचे ‘नाटक’ सुरू
By admin | Published: January 17, 2016 01:29 AM2016-01-17T01:29:20+5:302016-01-17T01:29:20+5:30
फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाची घंटा वाजण्याआधीच आयोजन समितीमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाची घंटा वाजण्याआधीच आयोजन समितीमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विद्याधर ठाणेकर यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मला बाजूला ठेवल्याचे सांगितल्याची तीव्र नाराजी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. मात्र, आयोजन समितीपैकी काही जणांनी असे काही नसल्याचे सांगितले. तर, काहींनी नाराजी उघडपणे व्यक्त न करता संमेलन झाल्यानंतर बोलणे उचित ठरेल, असा पवित्रा घेतला आहे.
२०१० साली ठाणे शहरात पार पडलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळीदेखील आयोजन समितीत झालेल्या मतभेदांमुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हे चित्र यंदा ठाण्यात होणारे ९६ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन सुरू होण्याआधीदेखील दिसून येत आहे. या नाट्यसंमेलनाला अवघा एक महिना राहिला असून संपूर्ण महाराष्ट्रात पडघम वाजू लागले आहेत. मात्र, संमेलनाची घंटा वाजण्याआधीच आयोजन समितीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नाट्यसंमेलनाची तारीख तसेच पदाधिकारी व कार्यकारी मंडळींची नावे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेचे मला निमंत्रणच आले नसल्याने मी उपस्थित राहिलो नाही. तसेच, गेल्या आठ दिवसांपूर्वी मला बाजूला ठेवण्यात यावे, असे शिवसेनेमधील काही बड्या नेत्यांनी आयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांकडे सांगितले आहे. अ.भा. मराठी नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेचा मी कार्याध्यक्ष आहे. संमेलनाचा प्रमुख कार्यवाह असताना मला कसे काय हे बाजूला ठेवू शकतात, असा नाराजीचा सूरदेखील त्यांनी काढला आहे. गेली आठ वर्षे नाट्यसंमेलन ठाण्यात व्हावे, यासाठी मी पत्रव्यवहार करीत होतो. ठाण्यात नाट्यसंमेलन होण्यासाठी मी परिश्रम घेतले आहेत. मात्र, मलाच बाजूला ठेवणे हे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणेकरांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीमुळे नाट्यसंमेलन सुरू होण्याआधीच वादाला तोंड फुटू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. आयोजन समितीतील काही पदाधिकाऱ्यांनी ठाणेकरांच्या वक्तव्याला विरोध दर्शविला आहे. तर, काही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कोणाशी वाईट घ्यायचे नाही. आधी नाट्यसंमेलन पार पडू देत, नंतर बघू असे सांगितले.