Join us

फाईन आर्टमधील नाटकांना लोकाभिमुख करताना तडजोडीला सामोरे जावे लागते; ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 06, 2023 4:49 PM

"...ते नाटक लोकांना आवडेपर्यंत टीकेला सामोरे जावे लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी केले."

ठाणे : फाईन आर्टकडे वळणारे नाटक आणि कमर्शियल आर्टकडे वळणारे नाटक यांत फरक आहे. फाईन आर्टकडे वळणारी नाटक ही लोकाभिमुख करायची असेल तर त्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागतात, मग ती समीक्षेच्या पलिकडे जातात. ते नाटक लोकांना आवडेपर्यंत टीकेला सामोरे जावे लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांनी केले.

अनघा प्रकाशनच्यावतीने डॉ. महेश केळुसकर लिखित 'बाळू कासारचा घोडा' व 'देवाक काळजी' आणि डॉ. प्रदीप कर्णिक लिखित ' ऱ्हासपर्व 'या नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृहात संपन्न झाले. यावेळी बेर्डे यांनी डॉ. केळुसकर यांनी लिहीलेली नाटकं ही वेगळ्या अंगाची असून व्यावसायीक रंगभूमीच्या अंगाची नाहीत असे म्हणाले.

ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.अनंत देशमुख म्हणाले की, नाटक हा साहित्याचा भाग आणि त्याचबरोबर ती प्रयोगक्षम कला आहे. त्याला संगीत, नेपथ्य, नृत्य, संहिता हे जोडलेले असते. कलावंत, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार यांचे टीमवर्क असते आणि या सगळ्याचा पाया संहीता असते. या संहितेला महत्त्व देऊन नाट्यसमीक्षा केली जाते आणि दुसरी प्रयोगाच्या अंगाने समीक्षा केली जाते. मी स्वत: नाट्य समीक्षा करणारा समीक्षक आहे. ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी म्हणाले की, आपल्याकडे १०० हून अधिक वर्षांची दिवाळी अंकाची परंपरा आहे.

१९०५ साली पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला तो २४ पानांचा होता. १९०९ साली प्रकाशित झालेला दिवाळी अंकाने साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक अंग अंतर्भुत केले. आजही दिवाळी अंक प्रकाशित होतात ही आश्वासक गोष्ट आहे. यावेळी डॉ. केळुसकर आणि डॉ. कर्णिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाशक अमोल नाले यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, अभिवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर अनघा प्रकाशनचे मुरलीधर नाले हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई