गूढत्वाचा खेळ रंगवणारी नाट्यमयता
By admin | Published: June 28, 2015 01:10 AM2015-06-28T01:10:36+5:302015-06-28T01:10:36+5:30
सतत सोबत राहणारी लव्हबर्ड्स या पक्ष्यांची जोडी हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे लव्हबर्ड्स पिंजऱ्यातही कायम एकमेकांची सोबत करत असतात.
नाटक : लव्हबर्ड्स
- राज चिंचणकर
सतत सोबत राहणारी लव्हबर्ड्स या पक्ष्यांची जोडी हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे लव्हबर्ड्स पिंजऱ्यातही कायम एकमेकांची सोबत करत असतात. पण मुद्दा असा, की पिंजऱ्यात ठेवलेल्या या जोडगोळीला एकत्र आणणारा तिसराच कुणी तरी असतो. म्हणजेच ही जोडी स्वत:हून एकत्र आलेली नसते; मग या जोडीतल्या दोघांना एकत्र आणले गेल्यामुळे ते एकमेकांवर प्रेम करत असतात का, या प्रश्नाचे उत्तर देणे तसे कठीण आहे. हीच बाब मानवी प्रेमालाही लागू होते का, हा नवीनच प्रश्न इथे मनात तरळतो आणि लव्हबर्ड्सचे माणसांशी असलेले साम्य किंवा जुळवून आणलेले नाते ठळकपणे अधोरेखित करतो. लव्हबडर््स हे नाटक या मुद्द्याला गवसणी घालत हा सगळा व्यवहार मंचित करते. पण इतके करूनच हे नाटक थांबत नाही; तर प्रेम, नाती व भावभावनांची सीमा ओलांडत, गूढत्वाची कास धरत रहस्यमय आणि थरारक खेळ मांडते.
जाहिरात क्षेत्रात नाव कमावलेल्या विश्वास इनामदार या तरुणाला अपघात होतो आणि त्यात त्याची स्मृती हरवते. त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागल्याने त्याचा चेहराही बऱ्यापैकी बदलतो. त्याची पत्नी देविका त्याला त्याची खरी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करते. अपघातातून सावरल्यावर विश्वास त्याच्या आॅफिसमध्ये जायला लागतो. त्याची सेक्रेटरी सुप्रियासुद्धा त्याला पूर्वस्मृतींची आठवण करून देते. अशातच विश्वासला आॅफिसमध्ये त्याने लव्हबर्ड्स विकत घेतल्याची पावती सापडते. या पावतीचा त्याला काहीच अंदाज बांधता येत नाही आणि तो चक्र ावून जातो. पावतीवर नोंद असलेल्या नंबरवर तो फोन करतो; तेव्हा त्याला कळून चुकते की हा लव्हबर्ड्स विक्रेता चक्क एक डिटेक्टिव्ह आहे. या प्रकाराने तर विश्वास पार भांबावून जातो. त्याने या निरंजन साने नामक डिटेक्टिव्हला कशासाठी पैसे दिलेले असतात, विश्वासच्या अपघातामागे कोणते गूढ लपलेले असते, मुळात विश्वास हा कोण असतो, या व अशा अनेक प्रश्नांची गूढता निर्माण करत ही नाट्यकृती खिळवून ठेवते.
नाटकातल्या चार व्यक्तिरेखांच्या माध्यमातून यातले नाट्य रंगभूमीवर पिंगा घालते. अपघातातून नुकताच सावरलेला, स्वत:च्या अस्तित्वाचा अंदाज घेत चाचपडणारा, थोडासा गोंधळलेला, एकामागोमाग एक अशा अविश्वसनीय गोष्टींना सामोरा जाणारा, तर शेवटी बसणाऱ्या धक्क्याने प्रचंड हादरणारा विश्वास इनामदार आणि त्याचा हा सगळा प्रवास ओंकार गोवर्धन याने भन्नाट सादर केला आहे. गूढत्वाचे ओझे बाळगत वावरणारी, निदान तसे भासवणारी, नवऱ्याला सावरणारी, त्याच्यावर येत राहणाऱ्या संकटांमध्ये त्याला साथ देणारी, निर्णय घेण्याबाबत ठाम असणारी अशी देविका; स्वत:भोवती सतत गूढ वलय घेऊन वावरणाऱ्या मुक्ता बर्वेने दमदार पेश केली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव, आवाजातला चढउतार आणि एकूणच तिने देविकाच्या पात्राला दिलेली ट्रीटमेंट लाजवाब आहे. डिटेक्टिव्ह साने यांची भूमिका विद्याधर जोशी यांनी अफलातून साकारली आहे. लव्हबर्ड्स विक्रेता ते डिटेक्टिव्हनेस या रेंजमधले सूक्ष्म विभ्रम त्यांनी ताकदीने मांडले आहेत. देहबोलीचा चपखल वापर करत त्यांनी रंगवलेला हा डिटेक्टिव्ह स्मरणात राहण्याजोगा आहे. केतकी सराफ हिने केलेली सुप्रिया या सेक्रेटरीची भूमिका लक्षवेधी आहे. निर्माते दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांनी रंगभूमीवर आणलेले हे नाटक म्हणजे थराराने अंतर्बाह्य वेढून टाकणारा असा अनुभव आहे.
गूढत्वाचे वलय पसरवत, रहस्याची मांडणी करत एक थरारक अनुभव देणारी संहिता गिरीश जोशी यांनी लेखणीतून उतरवली आहे. रहस्यात धक्कातंत्राचा चपखल केलेला वापर हे या संहितेचे वैशिष्ट्य आहे. पण रहस्यासोबत त्यांनी प्रमुख पात्रांच्या नातेसंबंधांचा उलगडलेला कंगोराही तितक्याच ठसठशीतपणे मंचित होतो. गिरीश जोशी यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, एक आखीव-रेखीव असा प्रयोग त्यांनी बांधला आहे.
प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत राहील, या हिशोबाने त्यांनी हा खेळ मांडला आहे. हा खेळ अनुभवणाऱ्याला विचार करण्यास उसंतच मिळू नये याची दक्षता घेत, क्षणोक्षणी काही ना काही मनावर ठसवत आणि मनातल्या विचारांना दोलायमान स्थितीत झुलवत त्यांनी बांधलेला हा प्रयोग खास म्हणावा लागेल.
पण एक नक्की, हा प्रयोग फार लक्षपूर्वक पाहावा लागतो, कारण यातला एक धागा जरी सुटला तरी त्याचा पुढचा संदर्भ लागणे कठीण होऊन बसते. या नाटकात काही प्रसंग दाखवताना चित्रफितीचा बेमालूम वापर केला आहे. त्यातून नाट्याला गती मिळते आणि एक वेगळा अनुभवही गाठीशी जमा होतो. विशेष म्हणजे, या माध्यमाच्या आहारी न जाता दिग्दर्शकाने याबाबत ठेवलेला संयम महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे या नाटकातल्या नाट्याला धक्का पोहोचत नाही.