आरे चेकनाक्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली मार्गिका काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:15 AM2020-01-08T01:15:24+5:302020-01-08T01:15:30+5:30
गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रुुतगती महामार्गावर आरे चेकनाका सिग्नलवर होणारी कोंडी मुख्यत्वे मेट्रो रेल्वेच्या कामातील दिरंगाईमुळे होते.
मुंबई : गोरेगाव पूर्व आरे चेकनाका सिग्नल येथे गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रुुतगती महामार्गावर आरे चेकनाका सिग्नलवर होणारी कोंडी मुख्यत्वे मेट्रो रेल्वेच्या कामातील दिरंगाईमुळे होते. पादचारी, विशेषत वृद्ध, अपंग यांना अतिशय धोकादायक परिस्थितीत रस्ता ओलांडावा लागतो. जोगेश्वरीहून गोरेगाव पूर्वेकडील, एच.पी. पेट्रोल पंप ते आरे चेकनाका सिग्नल या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आरे उड्डाणपुलाखालील जागेवरून एक मार्गिका काढा, अशी मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी केली आहे. त्यामुळे आरे कॉलनीत जाणारी किंवा दूधसागर मार्गावरील वाहतूक सुसह्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नोव्हेंबर महिन्यात नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, एमएमआरडीए अधिकारी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक आणि गोरेगाव प्रवासी संघ प्रतिनिधींनी सदर उड्डाणपुलाखालील जागेची संयुक्तपणे पाहणी करून वर नमूद मार्गिका काढण्यासाठी आढावा घेतला. आता जानेवारी सुरू झाला, पण अद्याप सदरबाबत कोणतीच कारवाई झाली नाही, अशी खंत चितळे यांनी व्यक्त केली.वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरे उड्डाणपुलाखालून मार्गिका काढण्याचा प्रस्ताव लवकर मार्गी लावावा, अशी मागणी गोरेगाव पूर्व परिसरातील नागरिक करत आहेत, अशी माहिती संघाचे कार्यकारिणी सदस्य सुनील माहुली यांनी दिली.