भार्इंदर : पूर्वेच्या मुख्य मार्गावरील पुष्पक बारजवळ बंटी उर्फ विजय प्रधान (४०) याची १३ एप्रिलला रात्री हल्लेखोरांनी गोळी मारुन हत्या केली. त्यात सचिन विजयकर गंभीर जखमी झाला. यातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरल्याचा आरोप होत असतानाच तब्बल ११ दिवसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांची रेखाचित्रे पोलिसांकडुन तयार करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशातील तिहार जेलमध्ये शिक्षा भोगणारा वाडा येथील कुख्यात गँगस्टर सुभाष सिंग ठाकुर याच्यासाठी बंटी मोठमोठ्या जमिनींचे व्यवहार करत असे. बंटी हा अंधेरीच्या वर्सोवा येथील रहिवाशी असुन त्याचा इस्टेट एजंटचा व्यवसाय आहे. शिवाय तो मीरा-भार्इंदर मानवाधिकार नावाच्या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असल्याने त्याचा मीरा-भार्इंदरशी चांगलाच संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात एका स्थानिक राजकीय नेत्याचे नाव पुढे येत असले तरी पोलिसांकडे त्याबाबत अद्याप ठोस पुरावा नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हत्येचे कनेक्शन युपीसोबत जोडले जात असुन ५ जणांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हल्ल्यावेळी परिसरातीली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारेकऱ्यांचे कोणतेही फुटेज आढळुन आले नाही. तरी पोलिसांचा तपास संभ्रम निर्माण करणारा ठरत असल्याचा आरोप आहे. बंटी सोबत काम करणाऱ्या दुर्गेश ठक्कर (५०) यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु ठक्कर यानी पोलिसांच्या या जुजबी कारवाई विरोधात जिल्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता पोलिसांनी ठक्करला सोडुन दिले. (प्रतिनिधी)