लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आतापर्यंत स्वतःच घर नसल्याने कुणी सरकारी क्वार्टर्समध्ये राहत होतं तर कुणी भाड्याच्या घरात, काहींना तर अंधेरीत जॉब असूनही थेट टिटवाळ्याहून प्रवास करावा लागत होता. मात्र म्हाडाच्या लॉटरीत घरे लागल्याने या सगळ्यांचेच प्रश्न मार्गी लागले आहेत आणि मुंबईत स्वतःच हक्काचं घर असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत वाहत असताना दिसत होता. म्हाडाच्या सोमवारी जाहीर झालेल्या लॉटरीमध्ये मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर नसलेल्या अनेकांची स्वप्नं सत्यात उतरली आहेत.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे ४,०८३ घरांची लॉटरी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आली. ‘म्हाडा’कडून परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारी घरे ही नेहमीच मुंबईकरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहेत. मात्र म्हाडा’च्या मुंबई मंडळाची यापूर्वीची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती त्यामुळे यावेळी म्हाडाच्या ४,०८२ घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे मुंबईतील ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अर्ज भरलेल्या अनेकांनी चव्हाण सेंटर येथे प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरील धाकधूक जाणवत होती.
दरम्यान, लॉटरी लागल्यावर ही बराच वेळ मेसेजेस न आल्यामुळे ही अनेकांची होत असलेली चलबिचल आणि अस्वस्थता लक्ष वेधून घेत होती. मात्र अर्ध्या-एक तासाने अनेकांना आलेले मेसेजेस त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलविणारे निश्चित होते.
एक वर्षाच्या बाळाची आई असलेल्या रूपाली या रोज टिटवाळा ते अंधेरी असा प्रवास करत होत्या. घरून लवकर निघणे आणि बाळाला खरे तर हवा तसा वेळ देता येत नव्हता. म्हणूनच म्हाडातून मुंबईत घरासाठी प्रयत्न करण्याचे रूपाली यांनी ठरविले होते. गोरेगाव येथे त्यांचे स्वतःचे हक्काचे घर असल्याचे समाधान त्यांना लॉटरीतून मिळालेल्या घरातून प्राप्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोरेश्वर यांना कलाकार कोट्यातूनच म्हाडाची लॉटरी लागली आणि त्यांना प्रचंड आनंद झाल्याने गहिवरून आले. अनेकदा प्रयत्न करूनही म्हाडाच्या घरचा लाभ न मिळाल्याने त्यांना अपेक्षा नव्हती, मात्र अनपेक्षितपणे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी सातत्याने देवाचे आभार मानले. घरी आई, बायको, मुले असे कुटुंब असलेल्या मोरेश्वर यांना गोरेगाव येथे घर मिळाल्याचे ते म्हणाले.
मागच्या १५हून अधिक वर्षापेक्षा अधिक काळ मंदाताई म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरत होत्या. मंत्रालयात काम करणाऱ्या मंदाताईंना २०११ साली घर लागले ही मात्र आवश्यक पैसे गोळा करू न शकल्याने तेव्हा त्यांना घराचा ताबा घेता आला नाही. मात्र यंदाच्या लॉटरीत मंदाताईंना विक्रोळीतील कन्नमवारनगर येथे घर लागले आहे. यावेळी जमेल तसे अगदी कर्ज काढून पैशांची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदिवली येथे राहणाऱ्या रोहितला पहिल्याच वेळी अर्ज करून पहाडी गोरेगाव येथे उपलब्ध असलेल्या म्हाडाच्या लॉटरीचा लाभ मिळाला आहे. आपल्याला लॉटरी लागली आहे हे कळताच पहिला कॉल आई-बाबांना केला आणि ही आनंदाची बातमी दिली असे त्याने सांगितले. स्वतःचे घर झाल्यावर आता लवकरच लग्नाच्या तयारीला लागणार असल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली.
मागील १३ वर्षे खार पश्चिम येथील खारदांडा येथे भाडे देऊन राहणाऱ्या प्रशांत नाखवा यांना पहाडी गोरेगाव येथे उपलब्ध सदनिकेसाठी म्हाडाची लॉटरी लागली. रेशनिंग ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत यांनी स्वतःच हक्काचे घर मुंबईत झाले याचेच मोठे समाधान असल्याचे सांगितले, तर त्यांच्या बायकोचा आरतीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. या आधीही एकदा मालाडच्या घरासाठी त्यांनी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी त्यांची संधी हुकली होती.
... आणि जोशी काकूंच्या डोळ्यात पाणी आले !
मी वयाच्या ५ व्या वर्षांपासून मुंबईत राहतो. सध्या गोरेगाव येथे भाड्याच्या घरात राहत आहोत. म्हाडाचे घर लागेल, असे वाटले नव्हते. पहिल्यांदाच अर्ज केला आणि घर लागले याचा आनंद आहे. माझे वय ६३ आहे. आज या वयात स्वत:चे मुंबईत घर झाले यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो, असे सांगताना नंदकुमार जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
म्हाडाच्या लॉटरीचे घर जाहीर झाले आणि सत्कार सोहळ्यासाठी पती-पत्नी जोशी यांना व्यासपीठावर बोलाविण्यात आले. जोशी दामप्त्याला प्रसारमाध्यमांचा गराडा पडला होता. जोशी काकूंनी थरथरत्या हातांनी नंदकुमार यांचा हात हातात घेतला. दोघे एकमेकांना पकडून व्यासपीठावर दाखल झाले. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. दोघांवरही कॅमेऱ्यांच्या नजरा खिळल्या. क्षणभर का होईना दोघांना आपण सेलिब्रेटी झाल्यासारखे वाटत होते. काकूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतानाच प्रेक्षकांचे डोळे नंदकुमार जोशींवर खिळले होते.
सत्कार स्वीकारून दोघेही व्यासपीठावरून खाली दाखल होत प्रेक्षकांमध्ये बसले. तिकडेही सर्वांचेच लक्ष त्यांच्यावर खिळले होते. तोवर त्यांचा मुलगा प्रथमेशही सभागृहात आला. आई-बाबांच्या डोळ्यातले पाणी पाहून प्रथमेशच्या डोळ्यातही आनंदाश्रू उभे राहिले. प्रसारमाध्यमांना क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी? हेच त्यांना समजेना. दोघांचे डोळे पाण्याने भरले होते. काकूंचे थरथरते हात काकांच्या हातात नकळत जात होते. तब्बल १५ मिनिटांहून अधिक काळ हा सोहळा भरलेल्या सभागृहात सुरू होता; आणि नंदकुमार जोशी यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून केला जात होता. या वयात आम्हाला घर मिळेल अशी अपेक्षा नव्हती, पण मिळाल्याने आनंद झाला होता.