जलद प्रवासाचे स्वप्न अडीच वर्षांत होणार पूर्ण; ‘मावळा’ लागला कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:34 AM2021-01-25T05:34:00+5:302021-01-25T05:34:43+5:30

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प : मशीन १२ मीटर गेली भूगर्भात

The dream of a fast journey will be fulfilled in two and a half years; ‘Mawla’ started working | जलद प्रवासाचे स्वप्न अडीच वर्षांत होणार पूर्ण; ‘मावळा’ लागला कामाला

जलद प्रवासाचे स्वप्न अडीच वर्षांत होणार पूर्ण; ‘मावळा’ लागला कामाला

Next

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईसह दक्षिण मुंबईतल्या वरळी, महालक्ष्मी, पेडर रोड, प्रियदर्शनी पार्कसह लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीतून वाट काढत नरिमन पॉइंट गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या प्रवासासाठी ४५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ जाताे. मात्र हीच ४५ मिनिटांची वेळ जुलै २०२३ मध्ये अवघ्या १० मिनिटांवर येईल. कारण मुंबई महापालिकेने हाती घेतलेला मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे (काेस्टल राेड) काम वेगाने पुढे सरकत असून, याच प्रकल्पांतर्गत बोगदा खणण्यासाठी भूगर्भात उतरलेल्या मावळा या टनेल बोरिंग मशीनने आपले काम सुरू केले आहे. आजघडीला ही मशीन १२ मीटर आत गेली असून, या प्रकल्पामुळे जलद प्रवासाचे स्वप्न अडीच वर्षांत पूर्ण होईल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केला.

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा, संपादकीय आणि सह व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासोबत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क, अमर सन्स आणि हाजीअली येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी चहल बोलत होते. तत्पूर्वी प्रियदर्शनी पार्क येथील प्रकल्पाच्या कार्यालयात दाखल झालेल्या विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांचे चहल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कार्यालयातील सभागृहात चहल यांच्यासह येथे उपस्थिती अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण करून माहितीचे आदान प्रदान केले.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पामुळे नागरिकांचा किती वेळ वाचेल, पार्किंगला कसा फायदा होईल, प्रकल्पामुळे मुंबईचा वेग वाढेल का, पर्यावरणाचे रक्षण होईल का, प्रकल्पाची जोडणी कुठे असेल, प्रकल्प कुठून कसा जाणार आहे, असे अनेक प्रश्न विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांनी उपस्थित केल्यानंतर चहल आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याची समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर प्रियदर्शनी, अमर सन्स आणि हाजीअली येथील प्रकल्प कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष नेऊन सविस्तर माहितीही दिली.

प्रियदर्शनी येथे भूगर्भात उतरलेल्या मावळा या मशीनकडून बोगदा खणण्याचे काम सुरू झाले आहे. विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांनी बोगद्याच्या कामाची पाहणी केली. मावळा ही मशीन पाहिल्यानंतर तेथील प्रकल्प ठिकाणांसह अमर सन्स आणि हाजीअली येथे या अवाढव्य यंत्राच्या मदतीने सुरू असलेल्या कामाची स्तुती केली. प्रकल्पातील विविध कामे आणि उद्यासाठी नवी स्वप्ने घेऊ येणाऱ्या सूर्यास्तास आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केले. हाजीअली येथे हा पाहणी दौरा सायंकाळी साडेसहा वाजता समाप्त झाला. विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांनी या प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पची माहिती घेतल्याबद्दल चहल यांनी त्यांचे आभार मानले; तर विजय दर्डा आणि ऋषी दर्डा यांनीही चहल यांना प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या.

भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर
मावळा या मशीनद्वारे जमिनीच्या खाली १० मीटर ते ७० मीटर खोलीवर महाबोगदे बांधण्यात येणार आहेत. ते खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून झाली आहे. बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणाऱ्या छोटा चौपाटीपर्यंत खणण्यात येतील. ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७ किलोमीटर तर एकूण व्यास १२.१९ मीटर असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा ११ मीटर असेल. बोगद्यांमधील हवा खेळती राहावी म्हणून बोगद्यांमध्ये सकार्डो नोझल ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येईल. भारतातील महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  •  एकूण लांबी १०.५८ कि.मी.
  • इंटरचेंजची लांबी १५.३३ कि.मी.
  •   इंटरचेंजेस - अमरसन, हाजी अली आणि वरळी.
  •  बोगद्याची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी.
  • भूमिगत कार पार्कसाठी ४ जागा आरक्षित.
  • ४५ मिनिटांच्या प्रवासासाठी लागणार अवघी १० मिनिटे
  • जुलै २०२३ मध्ये प्रकल्प पूर्ण हाेणे अपेक्षित.
  • रस्त्यांवरची रहदारी तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी हाेणार कमी.
  •  बीआरटीएसद्वारे सार्वजनिक वाहतूक सुधारणार.
  • अतिरिक्त हरित पट्ट्यांची निर्मिती.

 

मुंबईच्या पाेटात शिरणार मावळा
चीनमधून आयात केलेली ‘मावळा’ नावाची टनेल बोरिंग मशीन मुंबईच्या पोटात उतरली आहे. दाेन बोगदे खणण्यात येतील. एका बोगद्यास नऊ महिने मिळून दोन बोगदे खणण्यास अठरा महिने लागतील.

असा आहे प्रकल्प

  •  प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत.
  • प्रकल्पाची किंमत ८ हजार ४२९ कोटी.
  •  रस्त्याची लांबी १०.५८ किलोमीटर.
  • प्रकल्पामध्ये चार अधिक चार लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे.

 

असे असतील वळण मार्ग

  •  प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले.
  • अमरसन गार्डनमधील इंटरचेंज ४ वळण मार्ग, हाजी अली ८ वळण मार्ग आणि वरळी ६ वळण मार्ग.
  •  बोगदा खणणारी मशीन १२.१९ मीटर व्यासाची. भारतातील आतापर्यंत वापरण्यात आलेल्या मशीनपैकी सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम.

 

Web Title: The dream of a fast journey will be fulfilled in two and a half years; ‘Mawla’ started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.