मुंबई - लहानसं का असेना पण मुंबईत एक हक्काचं घर असावं असं प्रत्येक मुंबईकराला वाटतं. पण गेल्या काही वर्षात मुंबई विस्तारत गेली. मध्य मार्गावर कर्जत-कसारापर्यंत तर हार्बरवर नवी मुंबई, पनवेलपर्यंत पसरलेली मुंबई चारही बाजूने फुगत गेली आहे. पण तरीही मुंबईतल्या काही प्रसिद्ध विभागात घर विकत घेण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा आजही कायम असते. आताच्या घडीला दरमहिना लाखभर रुपये पगार घेणारा व्यक्तीही मुंबईत घर घेताना कचरतोय, एवढी मुंबईतल्या घरांची रक्कम गगनाला भिडतेय. मात्र तरीही मुंबईत अशी काही विभागं आहेत, जिथे आजही प्रत्येक मुंबईकराला घर विकत घेण्याची उत्सुकता लागून राहिलीय. चला तर पाहुया मुंबईकरांच्या स्वप्नातील ही घरं नक्की कोणत्या भागात आहेत.
वांद्रे
मुंबई उपनगरातील महत्त्वाची स्थानक म्हणजे वांद्रे. वांद्ऱ्यात राहणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जातं. एवढंच नव्हे तर अनेक दिग्गज बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री यांचे बंगलेही याच परिसरात असल्याने हा विभाग प्रचंड प्रसिद्ध आहे. एवढंच नव्हे तर अनेक हॉटेल्स, शॉपिंग मॉल, कॅफे वांद्ऱ्यात असल्याने मुंबईतून अनेकजण इकडे येत असतात. हा परिसर इंडस्ट्रियल विभाग म्हणूनही ओळखला जातो. या विभागात कॅथॉलिक समाज जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे अनेक चर्चही इथे आहेत. माऊंटबेरीची जत्रा तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे अशा विविध कारणांमुळे प्रसिद्ध असलेल्या वाद्ऱ्यांत आपलं घर असावं असं प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आहे.
अंधेरी
अंधेरीपर्यंत मेट्रो पोहोचल्याने मध्य मार्गावरील प्रवासही तिकडे विभागला गेला. वाहतुकीची साधनं उपलब्ध झाल्याने अनेक कार्यालयेही इकडे येऊ लागली. एवढंच नव्हे तर महत्त्वाचं छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टही अंधेरीतच असल्याने इथे प्रतिष्ठीत लोकांची ये-जा सुरूच असते. शिवाय अनेक हॉटेल्स, प्रशस्त सभागृह, शॉपिंग मॉल असल्याने सगळंच आपल्या पावलाखाली असतं. म्हणून इथं घर घेण्याची इच्छा मुंबईकरांच्या मनात आहे.
आणखी वाचा - मुंबईत इथे फिरा एक रुपयाही खर्च न करता
जुहू
मुंबईतील सर्वात महत्त्वाचं पर्यटनस्थळ म्हणजे जुहू चौपाटी. फेरफटका मारण्यासाठी या चौपाटीवर अनेकजण येत असतात. त्याचप्रमाणे हा विभाग शांत असल्याने शांतीप्रिय लोकांना इथं राहायला फार आवडतं. जुहू हा विभाग खवय्ये लोकांमध्येही फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्ये मंडळी इथे खादाडगिरी करायला आली की घर घेण्याची सुप्त इच्छा एकदा तरी बोलून दाखवतातच.
दादर
दादर म्हणजे मुंबईचा मध्यबिंदू. इथून सगळ्याच गोष्टी फार जवळ आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग, फूल बाजार, भाजी बाजार, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, अशा अनेक सुविधा या एकाच ठिकाणी मिळत असल्याने दादरकर फार निश्चित आयुष्य जगताना दिसतात. गेल्या काही वर्षात अनेक कार्यालयेही इकडे प्रस्थापित झाल्याने लांबवरचे चाकरमनीही इकडे येऊ लागली. दादर हे सर्वात व्यस्त स्थानक म्हणून उगीच ओळखलं जात नाही. म्हणून इथं घर घेण्यासाठी मुंबईकरांची धडपड सुरू असते.
आणखी वाचा - मुंबईतल्या खवय्यांसाठी या खाऊ गल्ल्या आहेत फेव्हरेट प्लेस
गोरेगाव
फिल्मसिटीमुळे नावाजलेला विभाग म्हणजे गोरेगाव. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंक रोड या दोन महत्त्वांच्या मार्गांमुळे गोरेगावकरांचं आयुष्य सुपरफास्ट झालंय. या मार्गांवर ट्राफिक असलं तरीही हे मार्ग अनेक विभागांना जोडत असल्याने मुंबईतल्या इतर विभागात जाणं सोपं झालं आहे. अशा सुपरफास्ट मार्गावर राहायला कोणाला आवडणार नाही? म्हणून मुंबईकर आपण इथं कधीतरी घर घेऊ या आशेत जगत असतो.
वरळी
मच्छेमारीसाठी कधी-काळी प्रसिद्ध असलेला हा विभाग आता श्रीमंताच्या विभागामध्ये गणला जातो. लोढा ग्रुप, डी.बी रिअॅल्टी, आक्रृती एरिया अशा विविध बांधकाम व्यावसायिकांनी हा भाग प्रतिष्ठेचा बनवला. तसंच अनेक सोयी-सुविधा अगदी पावलांखालीच असल्याने इकडे घर घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू असते. वरळी सी-फेस, अनेक मीडिया ऑर्गनायझेशनची कार्यालये, थोड्याच अंतरावर असलेलं महालक्ष्मी मंदिर, नेहरू सेंटर अशा विविध गोष्टींमुळे वरळी प्रसिद्ध आहे. तसंच अनेक जुन्या चाळीही आज वरळीमध्ये अस्तित्वात आहेत. या चाळी सध्या शेवटच्या घटका मोजत असल्या तरीही आपण कायम इथंच राहावं अशीच इच्छा इथल्या स्थानिकांची आहे.
आणखी वाचा - मुंबईतील 'या' भयानक आणि झपाटलेल्या जागा माहितेयत का?
मलबार हील
‘बस नाम ही काफी है’, असाच काहीसा मलबार हीलचा तोरा. मलबार हिलच्या परिसरात घर म्हणजे कोणा ऐरा-गैराचं काम नाही. गडगंज श्रीमंताच्या सानिध्यात घर घ्यायचं म्हणजे आपली आयुष्याची जमापुंजी खर्ची घातली तरीही इथं घर घेणं थोडं मुश्कीलच आहे. कदाचित म्हणूनच या ठिकाणी आल्यावर एक वेगळ्या प्रकारची इर्ष्या आपल्या मनात निर्माण होते. मुंबईतल्या काही तरुणाचं मलबार हिलमध्ये घर घेण्याचं ध्येय आहे. मलबार हिलमध्ये घर घेणं म्हणजे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं आहे.