सागरी पूल जोडणीचे स्वप्न पूर्ण; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज करणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:29 PM2023-05-24T12:29:43+5:302023-05-24T12:29:57+5:30
एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावा-शेवा या दोन्ही टोकांना जोडण्यात आला असून, पूर्ण झालेल्या या सागरी पुलाची पाहणी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित केली जाणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकमुळे नवी मुंबई मुंबईच्या आणखी जवळ येणार असून, मुंबई ते नवी मुंबई हे अंतर वेगाने कापता येणार आहे.
एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. सागरी पूल जोडण्यासाठी स्टील डेक टाकण्याचे काम वेगाने सुरू होते आणि आता ते पूर्ण होण्यासोबत सिमेंटचे डेक टाकण्याचे काम बाकी होते. स्टील डेकनंतर आता सिमेंटचे डेक टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. सागरी पूल शिवडी ते न्हावा-शेवा असा जोडण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवारी सायंकाळी पाहणी केली जाईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण होत असून, यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल.
देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग आहे.
टोल भरण्यासाठी महामार्गावर थांबण्याची आवश्यकता नाही.
पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून, बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे.
समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात आले आहेत.
सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता.
नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची बचत होईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
ईस्टर्न फ्री वेला हा प्रकल्प जोडणार असल्याने रायगडच्या दिशेने प्रवास शक्य आहे.