मुंबई : ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या २१ वर्षांखालील ‘ज्युनिअर मुंबई श्री’ स्पर्धेत फॉर्च्यून फिटनेस संघाच्या स्वप्निल मांडवकरने बाजी मारली. या शानदार विजेतेपदासह त्याने २४ जानेवारीला बीड येथे होणाऱ्या ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री’ किताबासाठी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत इस्माईल युसुफ जिमखान्याच्या चेतन तोरसकर आणि व्ही टू फिटनेसच्या अनिकेत पाटीलचे कडवे आव्हान होते. मात्र विजेतेपदाच्या लढतीत स्वप्निलने आपल्या पीळदार शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना परीक्षकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्याचवेळी चेतनने विजेतेपदाच्या लढतीतील कसर बेस्ट पोझरच्या लढतीत भरून काढताना सहज बाजी मारली.या वेळी शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या खेळाडूंसाठी घेण्यात आलेली स्पर्धाही लक्षणीय ठरली. ५५ किलो वजनी गटातील अशफाक अन्सारी याने दमदार प्रदर्शन करताना उपस्थितांची मने जिंकली. ‘महाराष्ट्र श्री’ विजेता मनिष आडविलकरच्या हस्ते अशफाकला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)
स्वप्निल ठरला ज्युनिअर मुंबई ‘श्री’
By admin | Published: January 08, 2016 3:08 AM