Join us

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; टी-शर्ट, रंगीबेरंगी कपडे नकोत! सामान्य प्रशासन विभागाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:16 AM

Dress code for government employees : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही  आता ड्रेसकोड लागू करण्यात  आला असून कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही  आता ड्रेसकोड लागू करण्यात  आला असून कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नीटनेटका स्वच्छ पेहराव करूनच ड्युटीवर यावे, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. हा आदेश राज्यातील सर्व शासकीय कायार्लयातील कर्मचारी, कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी, तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही लागू असेल. राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात भेट देणाऱ्या संबंधितांशी शासनाचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात. अशा वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा  भाग म्हणून ओळखला जातो. त्यावरून त्यांच्या विभागाची छाप पडते. त्यामुळेच काम करताना सर्वांनी वेशभूषेबद्दल जागरूक राहावे, अशी सूचना दिली जात होती. मध्यंतरी परदेशी पाहुणे मंत्रालयात आले असताना, काही अधिकारी, कर्मचारी जीन्स व टी-शर्ट घालून तसेच रंगीबेरंगी शर्ट घालून समोर आले होते. त्यामुळे शासनाची प्रतिमा चांगली जात नाही, असा सूर उमटला. त्यामुळे हा आदेश काढल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा, असे आदेशात म्हटले आहे.पेहरावाबद्दल अशी आहे नियमावली महिला  साडी, सलवार, चुडीदार, कुर्ता, ट्राउझर, पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट, तसेच आवश्यक असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. चपला, सँडल, बूट, शूज यांचा वापर करावा.पुरुष  शर्ट-पॅन्ट, ट्राउझर, पॅन्ट असा पेहराव करावा. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी.बूट, सँडल यांचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर घालून घेऊ नये.काही कर्मचारी, अधिकारी विचित्र पोषाखात येतात. सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. सगळ्यांना व्यवस्थित पगार मिळतो. चांगले कपडे घालून येण्यामुळे आपली चांगली प्रतिमा समाजासमोर जाते. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.    - जी.डी. कुलथे, राजपत्रित कर्मचारी - अधिकारी महासंघ

टॅग्स :महाराष्ट्र सरकारकर्मचारी