मुंबई : अंधेरी (प.) येथील अंधेरीच्या राजाला यंदाही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे, मिनी स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येणाऱ्या गणेशभक्तांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीने ड्रेसकोड २०१२ साली लागू केला होता. गेल्या वर्षी तोकडे कपडे घालून आलेल्या २०० गणेशभक्तांसह एका अभिनेत्रीला अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर आणि खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले की, ड्रेसकोड लागू करणारे आमचे मुंबईतील पहिले सार्वजनिक गणपती मंडळ आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात येथील मंडप परिसरात फोर जी वायफाय उपलब्ध करून देण्यात आले आहे. परळ रेल्वे वर्कशॉपमधील प्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांनी ८.५ फुटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती तयार केली आहे. यंदा अंधेरीचा राजा प्रसिद्ध अंबाजीमातेच्या मंदिरात विसावणार आहे. कला दिग्दर्शक धर्मेश शहा यांच्या संकल्पनेतून सुमारे २५० कलाकार गेले दोन महिने अहोरात्र काम करून अंबाजीमाता मंदिराचा हुबेहूब देखावा साकारत असल्याची माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.यंदा कोणताही घातपात होऊ नये, म्हणून २५ सीसीटीव्ही कॅमेरे येथे बसविण्यात आले आहेत. तर समितीचे सुमारे २५० कार्यकर्ते अहोरात्र जागता पहारा ठेवणार असल्याची माहिती समितीचे सचिव विजय सावंत यांनी दिली. १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. या दिवशी सायंकाळपासून संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते. दुसऱ्या दिवशी दुपारी वेसावे समुद्रात विसर्जन होते, अशी माहिती आयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)
अंधेरीचा राजाच्या दर्शनाला ड्रेसकोड
By admin | Published: September 11, 2015 1:56 AM