डीआरआयने १५ महिन्यांत केला २२ कोटींचा १५ टन गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:28 AM2019-11-04T06:28:28+5:302019-11-04T06:28:40+5:30
बाजारभावाप्रमाणे हस्तगत गांजाची किंमत २२ कोटी
खलील गिरकर
मुंबई : महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र केली असून, गेल्या १५ महिन्यांत सुमारे १५ टन गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत बाजारभावाप्रमाणे सुमारे २२ कोटी आहे. डीआरआयने अमली पदार्थांच्या विक्री विरोधात कडक पावले उचलली असून, त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. मार्च ते आॅक्टोबर या कालावधीत ९४ कोटी रुपये किमतीचे २३६ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी याला दुजोरा दिला.
डीआरआयने आॅगस्ट, २०१८ मध्ये ६.५ टन, सप्टेंबरमध्ये १.८ टन, फेब्रुवारी २०१९ मध्ये १७६ किलो, मेमध्ये १.४ टन, आॅगस्टमध्ये २७६ किलो, सप्टेंबरमध्ये १.३ टन व आॅक्टोबरमध्ये दोन टन गांजा जप्त केला होता. अशा प्रकारे सुमारे १५ टन गांजा जप्त करण्यात डीआरआयला यश आले होते. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे २२ कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले. ओरिसाच्या नक्षलग्रस्त भागातून गांजाची संपूर्ण देशभरात वितरण व विक्री केली जाते, असे सांगण्यात आले.
मार्चपासून आठ महिन्यांत ९४ कोटी रुपये किमतीचे २३६ किलो सोने जप्त
मार्च, २०१९ पासून आॅक्टोबरपर्यंत डीआरआयने २३६ किलो सोने विविध कारवायांमध्ये जप्त केले. त्यामध्ये मार्चमध्ये जप्त केलेल्या ११० किलो सोन्याचा, एप्रिलमध्ये जप्त केलेल्या १९ किलो सोन्याचा, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जप्त केलेल्या ७५ किलो सोन्याचा व त्यानंतर जप्त केलेल्या ३२ किलो सोन्याचा समावेश आहे. या जप्त केलेल्या सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे सुमारे ९४ कोटी रुपये आहे.