सुका मेव्याच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:39 AM2019-08-26T00:39:31+5:302019-08-26T00:39:35+5:30
सागर नेवरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सणासुदीच्या दिवसांची लगबग सुरू झाल्याने त्यासाठी लागत असलेल्या साहित्याच्या किमती आता वधारू ...
सागर नेवरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सणासुदीच्या दिवसांची लगबग सुरू झाल्याने त्यासाठी लागत असलेल्या साहित्याच्या किमती आता वधारू लागल्या आहेत. विशेषत: सुका मेव्याच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, आर्थिक मंदीची झळ या क्षेत्रातील व्यापारी वर्गास बसू लागली आहे. या सर्व घटाकांचा परिणाम म्हणून ग्राहकांनी सुका मेव्याच्या खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
गणपतीपासून दिवाळीपर्यंत मसाला मार्केटमध्ये सुका मेव्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. काही आठवड्यांपासून प्रतिदिन १०० ते १५० टन सुका मेव्याची आवक रोज होत आहे. बदामाचे दर आॅगस्टच्या सुरुवातीपासून वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये अफगाणिस्तान, इराण, इराक, अमेरिका, काश्मीर व इतर ठिकाणांवरून सुका मेवा विक्रीसाठी येत असून गणेशोत्सवापर्यंत ग्राहकांची मागणी अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दादर पश्चिमेकडील शिवसेना भवनलगतच्या छेडा सुपर मार्केटने दिलेल्या माहितीनुसार, बदाम ९८० ते १२०० रुपये प्रतिकिलो, काजू १२५० ते २६००, किसमिस ११०० ते २२००, अंजीर १५०० ते २८००, पिस्ता सॉल्टेड १९०० ते ३५००, पिस्ता प्लेन ३२००, अक्रोड १३०० ते २४००, जर्दाळू ११०० ते १६००, खजूर ४८० ते ११०० आणि ममरा बदाम ३ हजार ते ६ हजार ८०० रुपये किलो प्रमाणे सध्या बाजारात विक्री सुरू आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी सुका मेव्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तसेच अजून ग्राहकांची हवी तशी खरेदी सुरू झालेली नाही. परंतु येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात सुका मेव्याची खरेदी सुरू होईल.