मेट्रोने लावली सुकलेली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:24 AM2018-05-20T02:24:16+5:302018-05-20T02:24:16+5:30
माहिती अधिकारातून उघड : मानखुर्द, वडाळा येथे पुनर्रोपण शून्य
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने झाडे तोडण्यात येत आहेत. तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण करताना कॉर्पोरेशनकडून आरे कॉलनी भागात सुकलेली, मृत झाडे लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरे कॉलनी येथील ८.६ हेक्टरवर किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, मानखुर्द येथील मंडाला येथील ८ हेक्टर जागेवर किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, वडाळा येथील ८ हेक्टर येथील जागेवर आणि कफ परेड येथील जागेवर किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, याची माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारांतर्गत कॉर्पोरेशनकडे मागितली होती.
या प्रश्नावर मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाच्या वतीने येथे शून्य कार्यवाही करण्यात आल्याचे उत्तर दिले.
आरे दुग्ध कॉलनी येथील सर्व्हे नंबर १६९, २३ या ठिकाणांवरील गेट नंबर २१ आणि २५वर किती झाडे पुनर्रोपण करण्यात आली, या प्रश्नावर गेट नंबर २१ येथे ४०९ झाडे आणि गेट नंबर २५ येथे फक्त ७० झाडे लावण्यात आली आहेत. मेट्रो ३ भुयारी प्रकल्पातील १७ स्थानकांच्या जागेमध्ये ४४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे, असेही उत्तर देण्यात आले. मेट्रो ३ भुयारी प्रकल्पामध्ये एकूण २६ स्थानके आहेत. या स्थानकांदरम्यान एकूण ३ हजार ७९१ झाडे असून, यापैकी १ हजार ७४ झाडे तोडण्यात येणार आहेत. १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त १ हजार ९० झाडे ठेवली जाणार आहेत.