सीमा महांगडे
मुंबई : चहा म्हटले की सगळ्यांची झोप उडते, मुंबईत काय संपूर्ण जगात चहाप्रेमींची कमतरता नाही. मात्र वेळेत मिळणाऱ्या चहासोबत बिस्कीटही मिळाले तर, त्याची मजाच वेगळी..! चहा प्यायचाच पण त्यासोबतचे बिस्कीटही खायचे अशी पर्वणी दादरच्या शिवाजी पार्कात एक टेलिकॉम इंजिनिअर सध्या देत आहे. आशुतोष चौधरी या टेलिकॉम इंजिनिअर असलेल्या तरुणाच्या १०, १२ दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या या व्यवसायाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे त्याने तयार केलेले चहाच्या बिस्किटाचे कप पर्यावरणपूरक संकल्पनेला चालना देणारे असल्याने मुंबईकरांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लॉकडाऊन काळात बऱ्याच नागरिकांनी घरात असताना विविध उद्योग, व्यवसाय सुरू केले. अनेकांना यामुळे आर्थिक साहाय्यही मिळाले. खारघर येथील ए. सी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या आशुतोषचे वडील म्हणजे फक्कड चहाप्रेमी, त्यांच्या व आशुतोषच्या आईच्या पाठिंब्यामुळे आशुतोषने लॉकडाऊन काळात या संकल्पनेला चालना दिली. अनेक प्रयोगानंतर अखेर फेब्रुवारीत त्याने दादर येथील शिवाजी पार्क येथे ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सकाळी दोन आणि सायंकाळी दोन तास याप्रमाणे आशुतोष मागील २ आठवडे हा व्यवसाय ‘स्वादिष्टम’ या नावाने करत असून त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढे स्वतःचा हाच व्यवसाय सुरू ठेवण्याची त्याची इच्छा आहे.
आशुतोषचे चहाचे कप म्हणजे गव्हाचे पीठ, स्टार्च, व्हेजिटेबल ऑइल आणि विविध इसेन्स यांचे मिश्रण आहे. त्यामुळे या कपांना विविध चवी येतातच शिवाय १० मिनिटांपर्यंत या कपांमध्ये चहा राहू शकत असल्याचे त्याने सांगितले. चोको आणि इलायची फ्लेवर्सचे कप सध्या त्याची स्पेशालिटी असून, विविध स्वादांचा चहाही त्याच्याकडे असल्याने लोक त्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. विशेष म्हणजे ही संकल्पना पर्यावरणापूरक असल्याने त्याच्या या व्यवसायाला विशेष दाद मिळत आहे.
* प्रयत्नांना मिळाले मूर्त रूप
स्वतःचा स्टार्टअप करायचा ही सुरुवातीपासूनची इच्छा होती. त्याला आई-बाबांचा पाठिंबा व सहकार्य मिळाले. सध्या चाललेली पर्यावरणाची वाताहत थांबविण्यासाठी पुढाकार घेणे हाही यामागील उद्देश होता. या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू होता आणि आता तो यशस्वी होत आहे.
आशुतोष चौधरी, टेलिकॉम इंजिनिअर