Join us

तळीरामांनी वाढविला राज्याचा महसूल; ३० टक्क्यांनी वाढ, ९ महिन्यांत १४ हजार कोटी रुपये तिजोरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 6:55 AM

कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे.

मुंबई : मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाच्या रकमेत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल जमा झाला आहे.

कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे, तर  विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.बीअरची मागणी वाढली 

बीअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत २१ कोटी लीटर बीअर विक्री नोंदविली गेली होती. यंदा २३ कोटी लीटर बीअर आतापर्यंत रिचविली गेली आहे. वाइनच्या मागणीतही वाढ होत असून, नऊ महिन्यांत ८८ लाख लीटर वाइन विकली गेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ६६ लाख लीटर वाइन विकली गेली होती.

महसूल वाढ, लक्ष्य २२ हजार कोटींचे मागील संपूर्ण आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून १७ हजार ११७ कोटी रुपये महसूल मिळाला होता. या वर्षी आतापर्यंत १४ हजार ४८० कोटींचा महसूल मिळाला आहे. यंदा २२ हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य उत्पादन शुल्क विभागाकडून समोर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र