२०२४ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:26 AM2022-04-13T08:26:46+5:302022-04-13T08:26:59+5:30

जल संवर्धनासारख्या विषयावर आजची पिढी गांभीर्याने विचार करेल, त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे पाणी या घटकावर सर्वसमावेशक विचारमंथन होणे गरजेचे आहे.

Drinking water in every household till 2024 Information of Union Minister Gajendra Singh Shekhawat | २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची माहिती

२०२४ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची माहिती

Next

मुंबई :

जल संवर्धनासारख्या विषयावर आजची पिढी गांभीर्याने विचार करेल, त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे पाणी या घटकावर सर्वसमावेशक विचारमंथन होणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, त्याचबरोबर आता जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज असून तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविणार, असा विश्वास केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला.

विलेपार्ले येथील बी. जे. सभागृहात मंगळवारी ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘इंडिया वाॅटर व्हिजन २०४० ॲण्ड बियॉण्ड’ ही एकदिवसीय राष्ट्रीय जल परिषद झाली. उद्घाटनप्रसंगी शेखावत म्हणाले, शासनाकडून जलव्यवस्थापन किंवा संवर्धनाच्या क्षेत्रात सुरू असणारे प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यात  राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक स्वरूपातील निधी, सार्वजनिक कृतिशील धोरण आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जल व्यवस्थापनात अग्रक्रमावर पोहोचण्यासाठी भविष्यात जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे. हे सर्व जलसमृद्धीच्या माध्यमातून शक्य आहे. जलसमृद्धी ही केवळ लोक सहभागातून घडणार आहे. त्यामुळे पाण्याचे मूल्य सामान्यांनी ओळखले पाहिजे. भविष्यात जलस्त्रोत जपण्यासाठी आताच्या पिढीला हे स्त्रोत माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाणथळ जमिनी, तंत्रज्ञानाच्या साथीने जलव्यवस्थापन - पुनर्वापर अशा अनेक क्षेत्रात शासनाकडून काम सुरू आहे.

माजी मंत्री व भाजप आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार अमित साटम, आमदार अमरीश पटेल, फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी जल सुरक्षेचे गांभीर्य ओळखून केंद्र आणि राज्य स्तरावर सरकारने जलस्रोत संवर्धनासाठी सूक्ष्मपणे नियोजन केले पाहिजे, असे मनोगत ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे यांनी व्यक्त केले.

पाण्याविषयी दृष्टिकोन बदलायला हवा
देशात १३५ कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला बळ देण्यासाठी जलसंपत्ती जपण्याची आणि वाढविण्याची गरज आहे. आपल्या देशात लहान - मोठ्या सुमारे ८०० नद्या असतानाही जलसंपत्तीचा होणारा ऱ्हास खेदजनक आहे. नद्यांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे, त्यामुळे आतापासून पाण्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात २६ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित
१९७० पासून पाण्याचे अनेक प्रकल्प हे केवळ कागदावरच होते, तर काही प्रकल्प बंद पडले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंपत्तीचे वैभव टिकविण्यास या प्रकल्पांचा अभ्यास करून यातील १०६ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केले. त्यातील २६ प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. यासाठी ७० हजार कोटींची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.

१३५ कोटी लोकसंख्येची तहान भागवण्याचे आव्हान
८०० नद्या असतानाही जलसंपत्तीचा होतोय ऱ्हास 
७००००  कोटींची केंद्र शासनाची तरतूद 

Web Title: Drinking water in every household till 2024 Information of Union Minister Gajendra Singh Shekhawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी