पिण्याच्या पाण्याची बचत करणारा प्रकल्प संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:51 AM2019-11-06T02:51:42+5:302019-11-06T02:51:59+5:30
दशकापासून सुरू आहे प्रकल्प : वर्सोवा, घाटकोपर केंद्राची दर्जोन्नती, ६० कोटींचा खर्च
मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज १७०० दशलक्ष लीटर पाणी अन्य कामांसाठी उपलब्ध करण्याचा निर्धार महापालिकेने केला. या अंतर्गत मुंबईतील सात मलनि:सारण प्रकल्पाची दर्जोन्नती करण्याचा सुमारे १५ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. दशकानंतरही हा प्रकल्प संथगतीने सुरू आहे.
या प्रकल्पांतर्गत वर्सोवा आणि घाटकोपर या दोन मलनि:सारण प्रकल्पांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. या कामासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागार कंपनीला तब्बल ६० कोटी रुपये मोबदला देण्यात येणार आहे. ‘मुंबई मलनि:सारण प्रकल्प टप्पा दोन’ या प्रकल्पांतर्गत कुलाबा, वरळी, धारावी, वर्सोवा, घाटकोपर, मालाड, वांद्रे आणि भांडुप या केंद्राची दर्जोन्नती करण्यात येणार आहे.
सध्या या केंद्रांमध्ये केवळ प्राथमिक स्तरावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडून देण्यात येते. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.
यापैकी ६० टक्के पाणी गाडी धुणे, घरकाम, बागकाम यामध्ये वाया जात असते. या केंद्रात जमा होणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते अन्य कामांसाठी उपलब्ध केल्यास पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. या उद्देशाने मलजल प्रकल्प तयार करण्यात आला. दशकानंतरही या प्रकल्पाची प्रगती झालेली नाही.
वर्सोवा आणि घाटकोपर या केंद्रासाठी महापालिकेने सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स इंडिया या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
वर्सोवा केंद्रासाठी २१ कोटी रुपये तर घाटकोपर केंद्रासाठी ३९ कोटी रुपये असे एकूण ६० कोटी रुपये मोबदला कंपनीला मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. एका सल्लागारावर तब्बल ६० कोटी रुपये उधळण्यात येणार असल्याने या प्रस्तावाला विरोधकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
यासाठी मलजल केंद्रांची दर्जोन्नती
मुंबईची लोकसंख्या एक कोटी ७० लाखांवर गेली आहे. त्यात मुंबईबाहेरून शहरात कामासाठी येणाºया नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख आहे. मुंबईतील सार्वजनिक शौचालयांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. यासाठी चांगले पाणी वापरले जात असल्याने टंचाईच्या काळात मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरण्यायोग्य केल्यास उद्याने, रस्ते धुणे व अन्य कामांसाठी या पाण्याचा वापर करता येईल.