मुंबईतील चारकोप लिंक रोड ते मार्वे ‘रोप वे’ला चालना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:08 IST2020-02-16T06:08:05+5:302020-02-16T06:08:31+5:30
दोन मार्गिकांसाठी एमएमआरडीएच्या निविदा। पहिल्या टप्प्यात महावीरनगर गोराई मार्गिकेसाठी प्रयत्न

मुंबईतील चारकोप लिंक रोड ते मार्वे ‘रोप वे’ला चालना!
मुंबई : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या मुंबईतील चारकोप लिंक रोड ते मार्वे तसेच महावीरनगर लिंक रोड ते गोराई या दोन मार्गांवर रोप वे सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सल्लागारांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर या कामांसाठी निविदा मागविल्या आहेत.
मुंबईत मेट्रो रेल्वेची ३०० किमी लांबीची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे जाळे भक्कम होणार आहे. खाडी आणि डोंगराळ भागातील अंतर जलदगतीने कापण्यासाठी आणि मुंबईतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन रोप वे प्रकल्प सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. जुलै, २०१९ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी इंडियन पोर्ट रेल अॅण्ड रोप वे कॉर्पोरेशनची नियुक्ती केली होती. सल्लागारांनी दोन्ही मार्गिकांचा डीपीआर तयार केला. त्यानुसार, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (पीपीपी) या तत्त्वावर कामांसाठी निविदा मागविल्या आहेत.
यापूर्वी बोरीवली नॅशनल पार्क ते घोडबंदर रोड, वाशी ते घाटकोपर, माथेरान ते भिवपुरी रोड येथे रोप वे मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएने केला होता. मात्र, तो अपयशी ठरला. त्यामुळे मुंबईतील रोप वे उभारणीला कसा प्रतिसाद मिळतो हे निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख म्हणजेच १७ मार्च रोजीच कळू शकेल.
ज्या भागात मेट्रोचे जाळे विस्तारलेले नाही, ते भाग रोप वेच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या भागापर्यंत वाहतूक व्यवस्था पोहोचविण्यासाठी हा अभिनव प्रयत्न आहे.
- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए
अशी असेल मार्गिका
मेट्रो मार्ग २ (अ)च्या महावीरनगर मेट्रो स्टेशन ते गोराई गाव या ७.२ किमी लांबीच्या रोप वेवर सीताराम मंदिर चौक, चारकोप मार्केट, चारकोप आई चौक, टुरझोन पॉइंट, पॅगोडा, गोराई मिडल स्टेशन आणि गोराई गाव ही सात स्टेशन असतील. तर, चारकोप मेट्रो स्टेशन ते मार्वे या ३.५ किमी लांबीच्या रोप वेसाठी १० स्टेशन प्रस्तावित आहेत.