मुंबई : कल्याण ते तळोजा आणि ठाण्यातील गायमूख ते मीरा रोड येथील शिवाजी महाराज चौक या दरम्यान धावणा-या मेट्रो १२ आणि १० या मार्गिकांच्या कामे आता लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेल्या जनरल कन्सल्टंटची नियुक्ती येत्या पंधरवड्यात होईल. त्यानंतर प्रकल्प अहवालाच्या फेरतपासणीपासून ते प्रत्यक्ष काम सुरू करण्यापर्यंतच्या विविध आघाड्यांवरील नियोजनाला वेग येणार आहे.
जनरल कन्सल्टंन्सीसाठी काढलेल्या निविदांमध्ये एम्को, एयेसा, डीबी इंजिनिअरींग आणि कन्सल्टींग, एमएम- एसएमईसी, स्यास्त्रा या पाच कंपन्या तांत्रिक आघाडीवर पात्र ठरल्या आहेत. तांत्रिक आणि आर्थिक निकषांच्या आधारावर दिल्या जाणा-या गुणांकनाच्या आधारे यापैकी एका कंपनीची निवड होईल. या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या मुळ प्रकल्प अहवालाची फेरतपासणी करून त्याची व्यवहार्यता निश्चित करणे, तांत्रिक डिझाईन अंतिम करणे, प्रकल्पाची आर्थिक सुसाध्यता तपासणे, सुरक्षा, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणाच्या आघाडीवर नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे, कामाचा कालावधी निश्चित करणे ही कामे प्राथमिक टप्प्यावर या सल्लागारांकडून अपेक्षित आहेत. त्यानंतर या कामासाठी निविदा तयार करणे, त्याबाबतच्या वाटाघाटी करून त्या अंतिम करण्याची जबाबदारीसुध्दा सल्लागारांवरच असेल. पुढे प्रकल्पाच्या कामांवर देखरेख ठेवण्यापासून ते मार्गिकेचे लोकार्पण करण्यापर्यंतची कामे याच सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. पुढील चार वर्षांसाठी त्यांच्याकडे या कामांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
मेट्रो ४ आणि ९ जोडली जाणार
गायमूख ते शिवाजी चौक ही ९.२० किमी लांबीची मार्गिका असून वड्याळ्याहून ठाण्यातील कासरवडवली आणि पुढे गायमुखला जोडणा-या (मेट्रो ४ आणि ४ अ) चा तो विस्तार असेल. त्यात गायमूख रेतीबंदर, वर्सोवा, चार फाटा, काशिमीरा आणि शिवाजी चौक असी स्थानके त्यावर असतील. गेल्याच महिन्यांत मेट्रो ९ मार्गिकेवरील शेवटचे स्थानक दहिसर चेक नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे मेट्रो ९ ही मार्गिकासुध्दा १० ला जोडली जाणार आहे. कल्याण तळोजा ही २०.७५ किमी लांबीची मागिका ठाणे- भिवंडी कल्याण या मार्गिकेचा विस्तार आहे. त्यावर २१ स्थानके आहे.