चालक,वाहकांना रात्रपाळीचे ७ रुपये
By Admin | Published: January 20, 2015 11:10 PM2015-01-20T23:10:02+5:302015-01-20T23:10:02+5:30
चालक, वाहक मात्र, रात्र पाळीवर असतांना दु:खाच्या छायेत वावरतात गाव, खेड्यामध्ये रात्रीच्या वेळी बस थांबते तेथे शौचालयाची व्यवस्था नसते.
वाडा : दररोज प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर असणारे व हजारो प्रवाशांचा प्रवास सुखाचा करणारे एसटी महामंडळाचे बस चालक, वाहक मात्र, रात्र पाळीवर असतांना दु:खाच्या छायेत वावरतात गाव, खेड्यामध्ये रात्रीच्या वेळी बस थांबते तेथे शौचालयाची व्यवस्था नसते. पिण्याचे पाणी नसते, रात्रभर डासांच्या साम्राज्यात, ऊन, पाऊस, थंडीचा सामना करावा लागतो. गांवकरी देखील सहकार्य करीत नाहीत. या सर्व अडी-अडचणींचा सामना करुन पुन्हा सकाळी प्रवाशांच्या सेवेत हजर व्हावे लागत असल्याने वाहन चालक व वाहकांची प्रचंड कुचंबणा होत असून एवढा सगळा त्रास सहन करुन रात्र पाळीचा भत्ता म्हणून त्यांच्या वाट्याला फक्त सात रुपये मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळ घोर पिळवणूकच करत असल्याच्या प्रतिक्रिया चालक-वाहकाकडून उमटत आहेत.
एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर सर्व लहान मोठ्या शहरांना व मोठ्या गावांना रस्त्याने जोडून तेथे बस गाड्या सुरु करण्यात आल्या. कालांतराने गाव तेथे एसटीचे धोरण शासनाने राबवून सर्व गाव खेड्यांपर्यंत एसटी बसची सुविधा सुरु करण्यात आली. त्यामुळे आज दुर्गम व अतिदुर्गम गावेही एसटीने जोडली गेली आहेत. महामंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या कर्मचाऱ्यांना रात्र पाळीच्या मानधन सात रुपये कायम आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याकडे बघायला महामंडळाच्या प्रशासनाला वेळ मिळणार तरी कधी अशी विचारणा या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा सुरु केल्याने एसटी बस मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लग्न सराई, हिवाळ्यातील शाळांच्या सहली, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर एसटी आगारामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही.
(वार्ताहर)
१९५६ मध्ये वाहकाला कामाला सुरुवात करतांना दहा रुपयांची चिल्लर दिली जायची ती आता बंद झाली असून दहा रुपयांच्या दहा नोटा दिल्या जातात. त्यामुळे एसटी बस गाड्यांमधून प्रवास करताना वाहक एक-दोन रुपये चिल्लर देत नसल्याची प्रवाशांकडून नेहमीच तक्रार केली जाते.
बरेचदा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना बसमध्ये बसतानाच सुट्टे पैसे आहेत काय? अशी विचारणा वाहकाकडून केली जाते. कारण काही प्रवाशी सुट्टे पैसे असून देखील देत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढल्यानंतर वाहक तिकीटाच्या मागे चिल्लर पैसे लिहून देतो व गाडीतून उतरताना चिल्लर घेण्याचे सांगतो मात्र नेमके त्यावेळी वाहकाकडे चिल्लर पैसे राहत नसल्याने प्रवाशी व वाहकांमध्ये खटले उडतात.
वाहतूक वाढली त्यामानाने प्रवाशी वाढले परंतू राज्य परिवहन महामंडळाने चिल्लर देणे बंद केल्याने आज मितीस प्रवाशांच्या रोषाला वाहकांना बळी पडावे लागत आहे.