मुंबई : उच्च न्यायालयातील वकिलाकडे बदली चालक म्हणून चार महिने कामावर आलेल्या एका चालकाने आॅफिसमध्येच डल्ला मारला. त्यांच्या कार्यालयातील धनादेशाची चोरी करून त्यातून पाच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी या चालकाला अटक करण्यात आली आहे. कृष्णकांत शंकरलाल दुबे (२२) असे अटक चालकाचे नाव आहे.मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असलेला दुबे कामानिमित्त मुंबईत आला होता. या प्रकरणातील तक्रारदार अॅड. सुभाष अभ्यंकर यांचा कारचालक चार महिन्यांच्या सुट्टीवर गेला होता. त्यादरम्यान इमारतीतील एका सुरक्षारक्षकाच्या ओळखीने दुबे याला त्यांनी कामावर ठेवले. चालक असल्याने अभ्यंकर यांच्या आॅफिसमध्ये त्याचे येणेजाणे होते. त्यादरम्यान जानेवारी ते एप्रिल २०१६ दरम्यान त्याने जवळपास १२ धनादेश लंपास केले. चार महिन्यांनी अभ्यंकर यांचा जुना चालक कामावर परतला तेव्हा दुबे गावी निघून गेला. त्यानंतर त्याने त्या चेकवर बनावट सही करत दोन लाख, नंतर पन्नास हजार आणि त्यानंतर पुन्हा अडीच लाख अशी एकूण पाच लाखांची रक्कम काढली. हे पैसे त्याने त्याचा मोठा भाऊ सुनील दुबे याच्या खात्यात टाकले. मात्र सतत पैसे जात असल्याचे लक्षात येताच अभ्यंकर यांनी याबाबत संबंधित बँकेत पत्रव्यवहार करत याची माहिती दिली. तसेच चोरीला गेलेल्या धनादेशांचे स्टॉप पेमेंट करण्याची विनंतीही बँकेला केली. त्यानंतर दुबे मुंबईत परतला आणि तो त्याच्या आॅफिस परिसरात फिरताना त्यांना दिसला. तेव्हा दुबेला त्यांनी रंगेहाथ पकडण्याच्या उद्देशाने पुन्हा दोन धनादेश आॅफिस टेबलवर ठेवले. तेव्हा तेदेखील त्याने चोरले. ते धनादेश त्याने पुन्हा भावाच्या खात्यात टाकले आणि बँकेच्या मदतीने याबाबत अभ्यंकर यांनी पोलिसांना कळवले. त्याला २६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
चालकाचा वकिलाच्या धनादेशावर डल्ला, पाच लाख लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:38 AM