गौरी टेंबकर, मुंबई: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या सद्दाम मंडल (३२) याला हॉर्न वाजवल्याच्या रागात चार जणांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार मालवणीच्या अंबुजवाडी ऑटो रिक्षा स्टॅन्ड जवळ गेट क्रमांक आठ या ठिकाणी घडला. त्यानुसार पोलिसांनी मलिक नामक व्यक्तीसह चौघाविरोधात पुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मालवणीच्या अंबुजवाडी परिसरात राहणारे मंडल हे गेल्या सहा वर्षापासून सईकडे कारचालक म्हणून नोकरी करतात. अभिनेत्रीच्या शूटिंगच्या वेळा सतत बदलत असल्याने मंडळ यांच्या कामाची वेळही रोज बदलत असते. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे मोटर सायकल दुपारी २ वाजता कामावर गेले. तिथून ते रात्री दहा वाजता दुचाकीने परतत असताना अंबुजवाडी परिसरात असलेल्या बेलाकाचा बिल्डिंग समोर एक इसम मुद्दाम झिग zag करत गाडी पळवत होता. त्याच्या मागेही एक जण बसला होता त्यामुळे मंडळ यांनी हॉर्न वाजवला. तेव्हा त्याचा राग सदर मोटरसायकलस्वाराला आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अजून एका मोटरसायकल वरून दोघे मागून आले आणि त्या सर्वांनी जवळच पडलेल्या लाकडी बांबूने त्यांच्या हातावर हल्ला चढवला.
ते पाहून मंडळ यांचे मित्र इस्माईल खान व राजीव अन्सारी भांडण सोडवायला गेले. या हल्ल्यात मंडळ यांच्यासह खानही गंभीर जखमी झाले असून हल्ला करणार्यांपैकी एकाचे नाव मलिक असल्याचे समजले. त्यानुसार मंडळ आणि खान वंजारे यांनी उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात धाव घेत नंतर मालवणी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी हल्लेखोरांवर भारतीय दंड संहिता कलम ३२३,३२४,३४ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.