Join us

चालक मावा खाण्याच्या नादात, प्रवाशाने रिक्षा पळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 5:20 AM

रिक्षाचालक पानटपरीवर मावा घेण्यासाठी उतरताच प्रवासी रिक्षा घेऊन पसार झाल्याचा प्रकार साकीनाकामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : रिक्षाचालक पानटपरीवर मावा घेण्यासाठी उतरताच प्रवासी रिक्षा घेऊन पसार झाल्याचा प्रकार साकीनाकामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.रिक्षाचालक महेश भगवान रणभिसे (२३) यांच्या तक्रारीनुसार, १२ एप्रिलपासून मित्र अफजल खान (२४) याची रिक्षा भाड्याने चालवत आहेत. साकीनाका मेट्रो जंक्शन ते बुमरग या मार्गावर ते शेअरिंगने रिक्षा चालवतात. ९ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जात असताना, साकिविहार बस थांब्याजवळील पानटपरीकडे मावा घेण्यासाठी उतरले. रिक्षात प्रवासी होते, रिक्षाला चावी तशीच होती. ते पाच मिनिटांत परतले. तोपर्यंत रिक्षा दिसून आली नाही.त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र रिक्षा कुठेच मिळून आली नाही. या प्रकारामुळे त्यांचाही गोंधळ उडाला. अखेर, कोणीतरी रिक्षा चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, सोमवारी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षा नेमकी कोणी व कुठल्या मार्गाने नेली? तसेच प्रवाशांच्या वर्णनावरून ते रिक्षाचा शोध घेत आहेत. रणभिसे हेदेखील रिक्षाचालक मित्रांच्या मदतीने रिक्षाचा शोध घेत आहेत. यापूर्वीही प्रवासीच चोर निघाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यात, शेअरिंगमध्येही हा प्रकार झाला. त्यामुळे ठरवूनच चोर प्रवाशांनी संधी मिळताच रिक्षासह पळ काढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबई