गाडीचे उजवे दार उघडल्याने बाइकरचा झाला मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थांबलेल्या कारचा उजवा दरवाजा उघडल्याने अमन यादव (१९) या तरुणाचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. शुक्रवारी हा अपघात घडल्यानंतर याप्रकरणी कारचालकाला कस्तुरबा पोलिसांनी अटक केली आहे.
भावीन दोशी (५०), असे अटकेतील कारचालकाचे नाव असून, ताे व्यावसायिक आहे.
दोशी हा बोरिवली परिसरात राहत असून अपघातानंतर घाबरला होता. सीसीटीव्ही फुटेज व अन्य तपासाअंती त्याला अटक केल्याचे कस्तुरबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन तडाखे यांनी सांगितले. दोशीने त्याच्या कारचा उजवा दरवाजा उघडला. त्याच्या मागून येणाऱ्या यादवने हे पाहिले व कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात तो कारच्या दरवाजाला आदळला आणि गाडीसह खाली पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या बेस्ट बसखाली तो सापडला. त्यामुळे दुचाकीसह तो काही अंतर फरपटत गेला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
यादव हा दहिसरचा रहिवासी असून, महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आई आणि दोन बहिणींना हातभार लावण्यासाठी तो पार्टटाइम काम करत होता, त्याचदरम्यान हा अपघात घडून त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
...........................