Join us

नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत नेले फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:09 AM

पोलीस अंमलदार जखमी; मध्यस्थी करणाऱ्या दुकलीकडूनही दमदाटीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत ...

पोलीस अंमलदार जखमी; मध्यस्थी करणाऱ्या दुकलीकडूनही दमदाटी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार आझाद मैदान पोलिसांच्या हद्दीत घडला. यात अन्य सहकाऱ्याने चालकाला पकडून कारवाई करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने मोबाइल शूटिंग करून पोलिसांना शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. आझाद मैदान वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार विजय भिवराव असवले यात जखमी झाले.

असवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास डी. एन. रोड येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ससमोर असवले हे वॉर्डनसोबत कार्यरत होते. नाकाबंदीची कारवाई सुरू असताना, रात्री पावणेदहाच्या सुमारास एक तरुण जे. जे. ब्रिजच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसला. ब्रिजवर दुचाकी वाहनांना बंदी असल्याने त्यांनी तरुणाला थांबण्याचा इशारा केला. मात्र ताे न थांबता त्याने असवले यांना धडक देत फरफटत नेले. वाहतूक वॉर्डन विजाज रियाज सुलेमान यांनी त्याला पुढे जाऊन अडवले. अन्य दोन पोलीस अंमलदार तेथे आले. त्यांनी चालकास ताब्यात घेत चौकशी केली. चाैकशीत त्याचे नाव शारजील जाकीर अली खान (२३) असून, तो नागपाडा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करू लागले. त्यांना समजावत असताना एक जण पोलीस शिपाई सुनील बोरसे यांच्या अंगावर धावून गेला. अरेरावीची भाषा करून त्यांना धमकावले. पोलिसांनाच दमदाटी सुरू केली. पोलिसांनी नियंत्रण कक्षात कॉल करून मदत मागितली. घटनेची वर्दी लागताच आझाद मैदान पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी चालकासह अन्य दुकलीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी चालक शारजील आणि मोहम्मद कैफ खान (२१), फैजल अब्दुल रहीम शेख (२३) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई केली. यात असवले यांच्या पायाला दुखापत झाली.