चालकांनो, सावधान... मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:32 AM2024-01-15T10:32:14+5:302024-01-15T10:33:18+5:30
६,६८२ वाहनांची झडती, ड्रायव्हिंगचे ८५ गुन्हे.
मुंबई : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून राबविलेल्या विशेष ऑपरेशनअंतर्गत ६ हजार ६८२ वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. १८६९ विनाहेल्मेट चालकांसह रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. १०८ ठिकाणी नाकाबंदी करून ६ हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
विनाहेल्मेट १८६९, ट्रिपल सीट २५५ व विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या १३८ चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २० चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
रॅश ड्रायव्हिंग करणारे १५३ वाहने ताब्यात :-
पश्चिम प्रादेशिक विभागात वांद्रे रिक्लेमेशन, कार्टर रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, खेरवाडी जंक्शन, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर नाकाबंदीचे आयोजन केले.
या कारवायांत ७७ गुन्हे नोंद करून १५३ वाहने ताब्यात घेतली आहेत.
यापुढे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.