Join us

चालकांनो, सावधान... मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:32 AM

६,६८२ वाहनांची झडती, ड्रायव्हिंगचे ८५ गुन्हे.

मुंबई : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून राबविलेल्या विशेष ऑपरेशनअंतर्गत ६ हजार ६८२ वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. १८६९ विनाहेल्मेट चालकांसह रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. १०८ ठिकाणी नाकाबंदी करून ६ हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.  

विनाहेल्मेट १८६९, ट्रिपल सीट २५५ व विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या १३८ चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २० चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

रॅश ड्रायव्हिंग करणारे १५३ वाहने ताब्यात :-

 पश्चिम प्रादेशिक विभागात वांद्रे रिक्लेमेशन, कार्टर रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, खेरवाडी जंक्शन, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर नाकाबंदीचे आयोजन केले. 

 या कारवायांत ७७ गुन्हे नोंद करून १५३ वाहने ताब्यात घेतली आहेत. 

 यापुढे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस