लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतूकदेखील घटली आहे. रोजच्या प्रवासासाठी उपयोगात येणाऱ्या टॅक्सी, रिक्षा, बस प्रवासी घटल्यामुळे रस्त्यावर कमी प्रमाणात दिसत आहेत. तसेच विविध उद्योगधंद्यांसाठी उपयोगात येणारे ट्रक, टेम्पो देखील पार्किंगमध्ये धूळ खात उभे आहेत. परिणामी या वाहनांच्या चालकांवर याचा थेट परिणाम झाला आहे. वाहन कामाअभावी पार्किंगमध्येच उभे असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दीड वर्षापासून उत्पन्नच नसल्याने त्यांना आता हाताला मिळेल ते काम करावे लागत आहे. बँकेत जमा असणारी बचतदेखील संपल्याने आता कुटुंबाचा खर्च तरी कसा चालवावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. उत्पन्न काहीच नसताना कुटुंबासाठी रोज येणारा खर्च त्यांना न परवडणारा झाला आहे. यामुळे आता नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
* शहरात वाहने किती?
कार-जीप - १० लाख
दुचाकी - ९ लाख
रिक्षा - ४.६ लाख
टॅक्सी - ६० हजार रुग्णवाहिका - ५६१
* वाहने सुरू, पण गॅरेज बंद
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. यामुळे मुंबईत विविध परिसरांतील गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकाने व गॅरेज बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे वाहने दुरुस्त कशी करायची असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ग्राहक दुकानांसमोर येऊन गाड्यांचे स्पेअर पार्ट, इंजिन ऑइल यांची मागणी करतात. मात्र सकाळी दुकान उघडताच पोलीस दुकाने बंद करण्यासाठी येतात. असे दुकानमालकांचे म्हणणे आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
अनेक खासगी कार्यालये बंद असल्यामुळे ओला, उबेर, रिक्षा, टॅक्सी यांचा रोजचा व्यवसाय अत्यंत मंदावला आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट किंवा इतर कारखाने बंद असल्याने कच्च्या मालाचा पुरवठा करणारे ट्रक व टेम्पो चालकांचा व्यवसाय मंदावला आहे. अशातच गाडी बाहेर काढायची म्हटली तरी तिला डागडुजीसाठी गॅरेजमध्ये न्यावे लागते. मात्र गॅरेज बंद असल्याने वाहन दुरुस्ती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे नेमके करायचे काय, हा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा आहे.
* गॅरेजवाल्यांचे पोट-पाणी बंद
ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहील अशी संपूर्णपणे व्यवस्था गॅरेजमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मास्कशिवाय कोणालाच गाडी दुरुस्त करून देण्यात येत नाही. तरीदेखील पोलीस वारंवार गॅरेज बंद ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. यामुळे गरजू ग्राहकांना गाडी दुरुस्त करून देता येत नाही. यामुळे व्यवसायावरदेखील गदा आली आहे.
वाहने पार्किंगमध्येच
दीपक शिरसागर (कॅब ड्रायव्हर) - मी मुंबई विमानतळ ते पुणे कॅब चालवितो. मात्र यामुळे धंदा मंदावला आहे. त्यातच विमान प्रवाशांची संख्या घटल्याने गाडी आठवड्यातील चार दिवस पार्किंगमध्ये उभी असते. यामुळे बँकेचा हप्ताही सुटत नाही. उत्पन्न घटले आणि खर्च वाढल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
करणसिंह कोहली
गॅरेजमालक, जीटीबीनगर
..................................................